अकोला : राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी चांगलाच समाचार घेतला. पाशा पटेल यांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचं जानकर म्हणाले. ते अकोला जिल्ह्यातील सांगवामेळ येथे माध्यमांशी बोलत होते.
शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असा अजब सल्ला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना दिला. सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ शकत नाही असंही पाशा पटेल म्हणाले. त्यावर माजी मंत्री महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली.
सध्या शेतकरी वाईट परिस्थितीतून जात असताना पाशा पटेल यांच्यासारखे नेते असे बेजबाबदार वक्तव्य कसे करू शकतात असा प्रश्न महादेव जानकर यांनी विचारला. प्रजा ज्यावेळी अडचणीत असते त्यावेळी राजाने त्यांना मदत करणे अपेक्षित असते. सरकारी पदावर असलेल्या माणसाने असं वक्तव्य करणे योग्य नाही असं महादेव जानकर म्हणाले.
अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील विविध गावांना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर भेट दिली. तालुक्यातील सांगवामेळ, भटोरी, पारध, कौलखेड जहांगीर या गावांना त्यांनी भेटी दिल्यात. यावेळी जानकरांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत यावेळी त्यांनी फोनवरून जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची विनंती केली.
काय म्हणाले होते पाशा पटेल?
वर्षातले 365 दिवसांपैकी 332 दिवस शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असा अजब सल्ला केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिला आहे. ते एवढ्यावर थांबले नाहीत तर अतिवृष्टी व आपत्तीमुळे शेतकऱ्याचे होणारे नुकसान आता सरकार भरून देऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी मदतीबाबत झटकले.
सध्या राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे अशा परिस्थितीत शेतकरी सरकारकडून मदतीची आस लावून बसला आहे या पार्श्वभूमीवर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलेल्या अजब वक्तव्यामुळे नवीन वादाला फोडणी मिळाली आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा