मुंबई : राज्यात एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असताना दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना आणि सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीकडून राज्य सरकारला धारेवर धरलं जात आहे, तर अशा घटनांचे विरोधकांनी राजकारण करु नये, असे सत्ताधारी म्हणत आहेत. तर, मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी उभारली जाते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे आणि प्रहारचे बच्चू कडू यांची आज भेट झाली. या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना 15 दिवसांत तिसऱ्या आघाडीचा निर्णय जाहीर करू, असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
आज छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांच्यासमवेत माझी चर्चा झाली, मी एक कार्यकर्ता म्हणून संभाजीराजेंसोबत आहे. देशातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एक सैनिक म्हणून आम्ही महाराजांसोबत आहोत, असे म्हणत लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचं बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्या करुनही त्याची कोणतीही अंमलबजावणी होत नाही. कारण, सरकारवर कोणाचाही दबाव राहिलेला नाही. तर, विरोधी पक्षात असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार आणि विखेपाटील यांच्यासारखे नेते बाहेर पडल्याने विरोधीपक्ष कमकुवत बनला आहे. त्यामुळेच दबावासाठी तिसऱ्या आघाडीची बांधणी आम्ही करतोय. छ संभाजीराजे, रात्नराज आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. त्यानुसार, पुढच्या 15 दिवसांत तिसऱ्या आघाडीबाबत आम्ही घोषणा करू अशी प्रतिक्रिया प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी दिली.
उठाबशा काढून माफी मागा
दरम्यान, सिंधुदुर्गातील किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी बच्चू कडू यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, महाराजांच्या पुतळ्याबाबत उद्घाटन प्रसंगी असलेल्यांनी उठाबशा काढून माफी मागावी, असा टोला बच्चू कडू यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना लगावला आहे. तर, संभाजीराजे यांनीही पुतळा दुर्घटनेवरुन सरकारला प्रश्न विचारले आहेत. महाराष्ट्राला हे परवडणारं नाही, यापुढे पुतळा बसवताना सर्व मापदंड लक्षात घेऊनच पुतळ्याची उभारणी करायला हवी, असेही संभाजीराजेंनी म्हटले.
जानकरांकडून स्वबळाची चाचपणी
राज्यात महायुतीतील आणखी एक पक्ष स्वबळावर लढण्याची चाचणी करतोय. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षांनं राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातही चाचणी सुरू केली आहे. राज्यात सोहळ्याच्या दृष्टीने तयारी करत असल्याची माहिती रासपचे महादेव जानकर यांनी अकोल्यात बोलतांना दिली. अकोल्यात उद्या रासपचा 21 वा वर्धापन दिन सोहळा होतोय. त्यादृष्टीने जानकर यांनी स्वबळाच्या दृष्टीने केलेल्या वक्तव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाला आहे. त्यातच, आता बच्चू कडू आणि संभाजीराजे यांनी तिसऱ्या आघाडीबाबत भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी देखील जरांगे यांच्यासोबत राजकीय चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तर, मनोज जरांगे हे पुढील काही दिवसांत त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत.
हेही वाचा
अधिक पाहा..