अकोला : ‘इतरांच्या मनाचा भार हलका करणारा माणूस, स्वतःच्या अंतर्मनाच्या ओझ्याखाली गडप झाला…” अकोल्याच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी ही बातमी सध्या शहरात चर्चेचा, चिंतेचा आणि वेदनेचा विषय बनली आहे. अकोल्यातील (Akola) ‘सन्मित्र हॉस्पिटल’मध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रशांत जावरकर (Dr. Prashant Javarkar) यांनी विषारी इंजेक्शन घेत आत्महत्या (Sucide) केली. ही दुर्दैवी घटना न्यू तापडिया नगर परिसरातील त्यांच्या राहत्या घरी घडली. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असलं, तरी ही घटना मानसिक आरोग्य आणि आत्मिक पोकळी या दोघांवर प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे.

“मन समजणारा माणूस… स्वतःचं मन न समजून हरवतो तेव्हा!”

डॉ. जावरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. दीपक केळकर यांच्या ‘सन्मित्र हॉस्पिटल’मध्ये रुग्णांना समुपदेशन करत होते. तणाव, नैराश्य, एकटेपणा, व्यसनमुक्ती, अशा अनेक क्षेत्रांतील रुग्णांना त्यांनी नवजीवन दिलं. पण, जे हात इतरांच्या डोळ्यातलं पाणी पुसत होते, तेच हात अखेर स्वतःसाठी मदतीचे वाढले, पण उशीर झाला होता. केवळ बुद्धी नव्हे, आत्मा ही पोषणाचा हक्कदार असतो. या घटनेने एक गोष्ट स्पष्ट होते की शिक्षण, समज, मानसशास्त्र याहूनही वरचढ आहे आत्मबल. अनेक रुग्णांचे आधारवड ठरलेले डॉक्टर जावरकर, जेव्हा स्वतःच अंतर्मनात हरवले, तेव्हा हा समाज, ही यंत्रणा, ही नाती… कुठे होती? “आपण मनाची काळजी घेतो, पण आत्म्याच्या वेदनेला दुर्लक्षित करतो आणि मग हेच अधुरेपण आयुष्य तोडून टाकतं.”

अध्यात्म म्हणजे भावनिक आरोग्याचा खरा पाया

आजच्या स्पर्धात्मक, एकसुरी जगण्यात अध्यात्म, नामस्मरण, प्रार्थना, सत्संग, आत्मशोध यांना स्थानच उरलेलं नाही. माणूस यशस्वी होतो, प्रसिद्ध होतो, पण मनातून कोरडा राहतो. “प्रत्येक वेदनेला उत्तर मिळतं, पण त्यासाठी ‘आत्म्याशी संवाद’ हवा. आणि तो संवाद म्हणजेच अध्यात्म.”

या घटनेतून शिकण्याची वेळ आली आहे

डॉ.जावरकर हे गेले, पण त्यांनी मागे एक मोठा सवाल ठेवला आहे. “आज किती जण बाहेरून हसतात आणि आतून कोसळलेले असतात?” वेळीच लक्ष दिलं नाही, तर ही एक शोकांतिका नव्हे, तर समाजघटकांची साखळी तुटण्याची सुरुवात असू शकते.

आपण काय करू शकतो? : 

– दररोज थोडा वेळ ‘स्वतःसाठी’ काढा
– भगवंताशी एकाकी संवाद साधा
– सत्संग, ध्यान, नामस्मरण, कीर्तन यामध्ये सहभागी व्हा
– कुणी काही बोलायला येत असेल, तर ऐका, त्यासाठी शास्त्रज्ञ असण्याची गरज नाही, माणूस असणं पुरेसं आहे.

“जगातली सगळ्यात मोठी भीती म्हणजे ‘मी एकटा आहे’ ही भावना आणि सगळ्यात मोठा दिलासा म्हणजे ‘भगवंत माझ्यासोबत आहे’ ही अनुभूती. डॉ. जावरकर यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण त्यांच्या जाण्याने समाजाने एक मोठा आरसा समोर पाहायला हवा. तो म्हणजे मानसिक आरोग्याबरोबरच अध्यात्मिक आधारही तितकाच गरजेचा आहे. डॉ. प्रशांत जावरकर यांना ‘एबीपी माझा’ची भावपूर्ण श्रद्धांजली. 

हेही वाचा

मोठी बातमी : सोलापूरचे डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात 59 दिवसांनी आरोपपत्र, मनीषा मुसळेंविरोधात पोलिसांचे खळबळजनक दावे

 

आणखी वाचा



Source link