अकोला: हर्षवर्धन पाटील हे जेव्हापासून भाजपमध्ये आले आहेत, तेव्हापासून ते अत्यंत समर्पित वृत्तीने काम करत आहेत. त्यांनी कायमच भाजप पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या नेत्यांचं नेतृत्त्व मोठं झालं पाहिजे, ही पक्ष म्हणून भाजपची जबाबदारी आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. ते बुधवारी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातील अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यात सुरु असलेल्या वादाविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, हर्षवर्धन पाटील यांची काहीच नाराजी नव्हती. पण त्यांचे काही प्रश्न आहेत. इतकी वर्षे एकमेकांविरुद्ध लढल्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात. हे सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मी हर्षवर्धन पाटील यांना दिले आहे. किंबहुना काही प्रश्न सोडवले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी इंदापूरमधील अजितदादा गटाच्या एका पदाधिकाऱ्याने हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात आक्षेर्पाह वक्तव्य केले होते. तसेच त्यांना मतदारसंघात फिरुन देणार नाही, अशी धमकीची भाषा वापरली होती. या प्रकारानंतर हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती. तर हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी राष्ट्रवादीचा संबंधित कार्यकर्ता आणि अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात सुप्त तणाव निर्माण झाला होता. हर्षवर्धन पाटील उघडपणे नाराजी व्यक्त करत नसले तरी येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नाराजीचा फटका बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्या आजच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या भेटीत फडणवीसांना हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर करण्यात यश मिळाल्याचे सांगितले जाते.
माढ्यातील मोहिते-पाटलांची नाराजीही दूर करु; फडणवीसांना विश्वास
यावेळी देवेंद्र फडणवीस यांना माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात मोहिते पाटील घराण्याच्या असलेल्या नाराजीविषयी विचारण्यात आले. यावर फडणवीसांनी म्हटले की, आम्ही मोहिते-पाटील यांच्याशीही लवकर चर्चा करु. एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. जो महायुतीचा उमेदवार असेल त्याच्यासोबत काम केले पाहिजे. त्यामुळे आता राजी-नाराजी असेल, ती दूर केली जाईल. मोहिते-पाटील यांच्याशी मी चर्चा केली आहे, चंद्रशेखर बावनकुळेही त्यांच्याशी बोलत आहेत. गिरीश महाजनही परवा त्यांच्याकडे जाऊन आले. आमचा हाच प्रयत्न आहे की, सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
संजय राऊतांविषयी विचारताच देवेंद्र फडणवीसांचा बोलण्यास नकार
संजय राऊत यांनी बुलढाणा येथील आजच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख औरंगजेब असा केला होता. याविषयी देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरश: तोंड फिरवले. तुम्ही मला संजय राऊतांविषयी प्रतिक्रिया काय विचारता, माझी काहीतरी प्रतिमा ठेवा, असे म्हटले.
आणखी वाचा
अजित पवारांनी दुखावलेले हर्षवर्धन पाटील, शिवतारे, तावरे, जाचक, कुल, थोपटे कुणाला साथ देणार?
अधिक पाहा..