अकोला : धरण पाहण्यासाठी आलेल्या हौशी तरुणांची कार थेट धरणात बुडाली आहे. धरणाच्या आवार भींतींवर कार (Car) उभी करुन तरुण धरण पाहण्यासाठी गेले असता, अचानक कार हळूहळू धरणाच्या उताराच्या दिशेने खाली जाऊन पाण्यात बुडाली. सुदैवाने कार धरणात बुडाली तेव्हा कारमध्ये कोणी नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली आहे. अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या सातपुडा पायथ्याशी असलेल्या पोपटखेड धरणात हा प्रकार घडला. धरणात कार कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

अकोला जिल्ह्याच्या अकोट शहरातील काही तरुण (एमएच 05-एएस 3730)क्रमांकाची कार घेऊन पोपटखेड धरण पाहण्यासाठी गेले होते. कारमधील तरुण धरण पाहण्यासाठी उतरल्यानंतर आवार भिंतीवर उभी असलेली कार अचानक धरणातील पाण्कडे सरकत गेली, काही वेळातच ही कार पाण्यात पडली. त्यानंतर, कारमधील युवकांनी स्थानिकांकडे मदतीसाठी याचना केली. यावेळी, वीर एकलव्य बचाव पथकानं आपल्या चमूसह धरणात बुडालेली कार ओढून बाहेर काढली. सुदैवाने कारमधील युवक धरण पर्यटन करत असल्याने कारमध्ये नव्हते. या दुर्घटनेत कारचे नुकसान झाले असून कार बाहेर काढल्यानंतर तरुणांनी सुटकेचा निश्वास टाकला.

दरम्यान, अकोट तालुक्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेलं पोपटखेड धरण आहे. येथील परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने धरण पाहण्यासाठी येत असतात. मात्र, या धरणावर कोणीही सुरक्षारक्षक नसतो. त्यामुळे पर्यटक त्यांची वाहने थेट भिंतीवर घेऊन जातात. यापूर्वी या ठिकाणी अनेक दुचाकी भिंतीवरून धरणात घसरल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय धरणाच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. म्हणून आता या ठिकाणी सुरक्षेचा उपाय करण्याची मागणी होतेय. दरम्यान, आजच्या घटनेतून बोध घेऊन प्रशासनाकडून येथील धरण पर्यटनाला काही नियम व बंधन घातली जातील. त्यामुळे, भविष्यातील दुर्घटना टाळल्या जातील. कारण, पावसाळ सुरू झाल्यानंतर धरणाचे पाणी वाढते, तसेच धरण पर्यटनही वाढताना दिसून येते.

हेही वाचा

Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, फक्त सलमानच नव्हे तर आणखी दोन कलाकार होते रडारवर!

Source link