Mhaharashtra Local Body Election 2026: निवडणुकीसंदर्भातील तयारीमध्ये टाळाटाळ केल्याप्रकरणी आणि बेजबाबदार वागणुकीप्रकरणी तब्बल 6 हजारांहून अधिक कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणूक प्रक्रियेत नियुक्त कर्तव्ये पार पाडण्यास गैरहजर राहिलेल्या एकूण 6 हजार 871 अधिकारी व कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यापैकी 2 हजार 350 अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले आहेत, तर वारंवार सूचना देऊनही प्रशिक्षण, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया अथवा नेमून दिलेल्या निवडणूक कर्तव्यामध्ये हजर न राहणाऱ्या 4 हजार 521 जणांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील कर्मचारी म्हणून नियुक्ती करुनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्यांविरोधात 12 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून कारवाई करण्यात येणार आहे.

Add Zee News as a Preferred Source

अनेकदा इशारा

अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध आजपासून पोलीस कारवाई केली जाणार आहे. अगदी नोकरी जाण्याची वेळ या कर्मचाऱ्यांवर येणार नाही. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार हा कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. महापालिकेच्या मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मतदान प्रक्रियेविषयीचे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक होते. जे अधिकारी आणि कर्मचारी प्रशिक्षण सत्रास गैरहजर राहिले आहेत, त्यांना 10 जानेवारीला अंतिम संधी देण्यात आली होती. 11 जानेवारीपासून निवडणूक कायद्यांतर्गत कडक शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला होता. त्यानुसार आजपासून कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे.

कारवाई करण्यात आलेले कर्मचारी कुठे काम करतात?

महापालिकेकडून ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, त्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय बँक, बेस्ट, बीएसएनएल, एचपीसीएल, विमा कंपनी, एलआयसी, म्हाडा, एमटीएनएल, टपाल खाते, रेल्वे, आरसीएफ, नाबार्ड या शासकीय/निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम आदींतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद, दंडात्मक कारवाई तसेच विभागीय शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

निवडणूक आदेश नाकारणाऱ्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवरील कामकाजाकरिता निवडणूक विभागाकडून बजावण्यात आलेले आदेश नाकारल्याप्रकरणी ठाण्यातील रेन्बो इंटरनॅशनल या शाळेच्या मुख्याध्यापिकेवर राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभराव यांनी दिली. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर विविध शासकीय-निमशासकीय आस्थापना तसेच खासगी शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाचे कर्मचारी ठाण्यातील रेन्बो इंटरनॅशनल शाळेत नियुक्तीचे आदेश बजावण्यासाठी गेले असता मुख्याध्यापिका विमलेश सिंधू यांनी आदेश स्वीकारण्यास नकार दिला. या प्रकरणी रेन्बो इंटरनॅशनल शाळा आणि मुख्याध्यापिकेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp