Bacchu Kadu : सध्या राज्यात शक्तीपाठ महामार्गावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. विरोधकांनी शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला आहे. शेतकऱ्यांचं नुकसान करणारा हा महामार्ग नको अशी भूमिका शेतकऱ्यांसह विरोधकांनी घेतली आहे. दरम्यान, याच शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्यावरुन प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu ) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांना टोला लगावलाय. तसेच देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो देखील शेअर केलाय.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
आधी जागरण खऱ्या शक्तिपीठाचं! धनधान्य देणारी काळी आई ही खरं शक्तिपीठ असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तिच्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्याला न्यायाचा महामार्ग खुला करुन देणं हे शासनाचं आद्य कर्तव्य असल्याचे कडू म्हणाले. 85000 हजार कोटीचा महामार्ग आम्ही मागितला नाही तो आमच्यावर थोपवू नये असेही कडू म्हणाले. कर्जमाफी कडे सोयीस्कर दुर्लक्ष करत काही अडाण्यांचे खिसे भरण्यावर भर देण्याची आवश्यकता नसल्याचे कडू म्हणाले. आधी भूमीरुपी खऱ्या शक्तिपीठाचं रक्षण महत्वाचं आहे. म्हणूनच शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या सर्व संघटनांना आमचा पाठिंबा असल्याचे बच्चू कडू यावेळी म्हणाले.
आधी जागरण खऱ्या शक्तिपीठाचं!
धनधान्य देणारी काळी आई ही खरं शक्तिपीठ आहे. आणि तिच्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्याला न्यायाचा महामार्ग खुला करून देणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे!
८५,००० हजार कोटीचा महामार्ग आम्ही मागितला नाही तो आमच्यावर थोपवू नये.
कर्जमाफी कडे सोयीस्कर दुर्लक्ष करत… pic.twitter.com/jJPAGkFVn5
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) June 30, 2025
Shaktipeeth Expressway : कसा असेल शक्तिपीठ महामार्ग?
विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांधापर्यंत एकूण 805 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे. राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असेल. महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असेल. 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असतील. शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल 86 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
कोणत्या देवस्थानांना हा महामार्ग जोडणार?
कोल्हापूर – अंबाबाई, तुळजापूर – तुळजाभवानी. नांदेड – माहूरची रेणुका देवी या तीन शक्ती पीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे. परळी वैजनाथ, हिंगोली जिल्ह्यातील औंधा नागनाथ (नागेश्वर), माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर या बारा देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे.
समृद्धी महामार्ग रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण झाला. आता शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करणार असून त्यामुळे मराठवाड्याचे आर्थिक चित्र बदलेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग तीन शक्तिपीठांसह अनेक मोठ्या धार्मिक ठिकाणांना जोडणारा असल्याचे फडणवीस म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
Shaktipeeth Expressway : समृद्धी महामार्ग रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण, आता शक्तीपीठ महामार्गही करु, देवेंद्र फडणवीसांचा निर्धार!
आणखी वाचा