अकोला : सावत्र बाप आणि त्याच्या मित्रानं मिळून एका निरागस मुलाला आयुष्याच्या मध्यावरच गाठलं… कारण फक्त एवढंच, की तो पुढे जाऊन संपत्तीत वाटा मागेल. अकोला जिल्ह्यातील (Akola Crime News) अकोट येथे ही अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली आहे. दर्शन वैभव पळसकर (वय 9) या निष्पाप मुलाचा सावत्र वडील आकाश साहेबराव कान्हेरकर याने गौरव वसंतराव गायगोले या मित्राच्या मदतीनं गळा आवळून खून केला आणि त्याचा मृतदेह अकोला व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात फेकून दिला.(Akola Crime News)
नेमकं काय घडलं?
2 जुलै रोजी सकाळी साडे आठ वाजता दर्शन हा कुणालाही न सांगता घराबाहेर पडल्याची माहिती त्याच्या आईने पोलिसांना दिली. अकोट शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल झाली. तपासाच्या सुरुवातीला पोलिसांना सावत्र वडिलांवर संशय गेला, कारण नुकत्याच बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दर्शन आपल्या वडिलांसोबत जाताना दिसून आला होता.यातून तपासाची दिशा स्पष्ट होत गेली आणि चौकशीत आकाशने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आपल्या मित्रासोबत दर्शनला दुचाकीवर जंगलात नेलं आणि गळा आवळून हत्या केली.
जंगलात 12 तास शोधमोहीम
गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर अकोट पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवली. 60 पोलीस कर्मचारी आणि 7 अधिकाऱ्यांनी 12 तास जंगल परिसरात शोध घेत मृतदेह शोधून काढला. सध्या मृतदेह अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
फक्त 300 रुपयांसाठी गौरव बनला खुनात साथीदार
या अमानवी हत्येतील धक्कादायक बाब म्हणजे, आकाशने आपल्या मित्राला फक्त 300 रुपयांच्या मोबदल्यात या गुन्ह्यात सहभागी करून घेतलं. गौरव गायगोले नावाच्या या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
लैंगिक अत्याचाराचा संशय
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दर्शनवर लैंगिक अत्याचार झाला असण्याची शक्यता आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच याबाबत निश्चितता येणार आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
सावत्र नात्यांची दाहकता
ही घटना केवळ एका मुलाच्या निर्घृण हत्येपुरती मर्यादित नाही, तर सावत्र नात्यांमधील अविश्वास, संपत्तीची लालसा आणि माणुसकी गमावलेलं मनोवृत्त यांचं दु:खद दर्शन घडवणारी आहे. आयपीएस अधिकारी आणि अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू असून दोघा आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निष्पाप दर्शनसाठी न्यायाची मागणी
अकोटसह संपूर्ण जिल्ह्यात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून, आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. न्यायासाठी लढणाऱ्या आईच्या डोळ्यातील अश्रू आणि 9 वर्षांच्या त्या निष्पाप चेहऱ्याचं स्मरण प्रत्येक संवेदनशील मनाला चटका लावून जातं आहे.
आणखी वाचा