अकोला : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी नाशिक (Nashik) येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहे. अशातच रामगिरी महाराज यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार  अमोल मिटकरी (Amol Mitkari) चांगलेच आक्रमक झाले आहे.

अमोल मिटकरींनी महंत रामगिरी महाराज यांच्यावर टीका करताना वापरलेल्या शब्दावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रामगिरी महाराजांवर टीका करतांना आमदार मिटकरींनी कुत्र्याचा दाखला दिलाय. भगव्या रंगाचा कुत्रा असला तर तो संत होऊ शकत नाही, असं आमदार अमोल मिटकरी म्हणालेय. याबरोबरच रामगिरी महाराज यांचा उल्लेख त्यांनी लफंगा असा केलाय. रामगिरी महाराजांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी ही आमदार मिटकरींनी यावेळी केलीये.

संन्यासाच्या वेशात गुंडागर्दी करण्याचा हा प्रकार

भगवे कपडे घातल्यानंतर जर कोणी संत व्हायला लागले असते तर अनेक श्वानांचा रंग सुद्धा भगवा असतो. भगवे श्वान तरी सहज वेश त्याचा, असे संत तुकाराम महाराज यांचे प्रमान आहे. त्यामुळे भगवे श्वान संत होऊ शकत नाही, तसं प्रत्येक भगवे कपडे परिधान केलेला व्यक्ती हा संत होऊ शकत नाही. यापूर्वी देखील अनेक लोकांनी धर्माच्या नावावर जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केलेत. बांगलादेशमध्ये जे प्रकार घडत आहे त्याचे मी समर्थन करणार नाही. मात्र, बांगलादेश इथल्या अत्याचाराचा आणि देशातल्या अत्याचाराचा संबंध काय? कोण देशातलं वातावरण खराब करत आहे? कुठल्या धर्माच्या लोकांनी हिंदू धर्मीयांबद्दल अपशब्द वापरले? किंवा कुठल्या हिंदूंनी मुसलमानांविरुद्ध अपशब्द वापरले? असं काहीही नसताना आपल्या धर्माचे तत्त्वज्ञान सांगत असताना आपल्या धर्मातील  चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे.

इस्लाम धर्मियांचे जे श्रद्धास्थान आहे.   त्यांच्याबद्दल अपशब्द बोलताना या महाराजांनी विचार करायला हवा. त्यामुळे अशा महाराजांनी बोलत असताना विचार करून बोलावं. तसेच अशा महाराजांवर कायद्याचा वचक असावा. कुठल्याही धर्माची विटंबना होत असताना, कुठल्या ही धर्मीयांच्या भावना दुखवत असताना, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यांना हे चांगल्याने माहित असताना अशा प्रकारचे विधान करणे म्हणजे संन्यासाच्या वेशात गुंडागर्दी करण्याचा हा प्रकार असल्याची टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

देशद्रोह्यासारख्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करा

आपण ज्या विदर्भात राहतो त्याच विदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होऊन गेले. याच तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये मोहम्मद पैगंबरांबद्दल उल्लेख आहे. त्यात त्यांनी देखील मोहम्मद पैगंबर यांचे वर्णन केले आहे. स्वतःचे नाव रामगिरी ठेवत असताना त्यांना आपल्या नावाचे देखील भान राहिले नाही. दुसऱ्या धर्माचा अपमान करा, असे कुठल्याही धर्माने सांगितलेले नाही. त्यामुळे रामगिरी महाराज यांनी केलेले वक्तव्य अतिशय चुकीचे आणि निंदनीय आहे. त्याचे कुणीही पाठ राखण करणार नाही. देशद्रोह्यासारख्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी ही  आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link