अकोला : राज्यात महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज भाजप नेते आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. तर, दुसरीकडे पुण्यातील आंबेगाव मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने ती जागा आम्हाला सोडावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे, महायुतीमधील तीन पक्षांमध्ये आलबेल नसल्याचं सातत्याने समोर येत आहेत. त्यातच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कोटी करणाऱ्यांना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सातत्याने प्रत्युत्तर देतात. त्यातून, ते अनेकदा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवरही हल्लाबोल करतात. त्यातूनच आमदार मिटकरी आणि भाजपचे जगदीश मुळीक यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.
अजित पवार (Ajit pawar) यांच्या जनसन्मान यात्रेवेळी नाशिकच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे अजित पवारांच्या ताफ्याला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते. त्यावरुन संतापलेल्या अमोल मिटकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या या कृतीवरुन थेट देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला होता. यावर पुण्यातील भाजपचे नेते जगदीश मुळीक यांनी आक्रमक होत अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना चांगलेच फैलावर घेतले. आता, अमोल मिटकरींनी जगदीश मुळीक यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जगदीश मुळीक यांनी एकेरी व शेलक्या शब्दांमध्ये अमोल मिटकरी यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे, मिटकरी यांनीही त्याच पद्धतीने मुळीक यांच्यावर प्रहार केला आहे.
जगदीश मुळीक यांच्या टीकेला अमोल मिटकरींनी एकेरी भाषेतच उत्तर देत मुळीकांवर जोरदार प्रतिहल्ला केलाय. देवेंद्रजींना खुश करण्यासाठी तो माझ्यावर एकेरी भाषेत सरकला, माझ्यावर एकेरी टीका करणाऱ्या जगदीश मुळीक याची लायकी काय?, असा सवाल मिटकरी यांनी केला. तसेच, 2019 मध्ये मतदारसंघात कामे न केल्यामुळे वडगाव शेरीमध्ये लोकांनी मुळीकांचा पराभव केला. भविष्यात मुळीकांनी एकेरी भाषेत टीका केली तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं. तर, जगदीश मुळीकांसारख्या वळवळणाऱ्या लोकांनी थोबाड बंद करावं, आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला एकेरी भाषेत बोलू नये, असेही मिटकरींनी म्हटले.
काय म्हणाले होते मुळीक
”ए मिटकरी, तुझी पात्रता आहे का? मा. देवेंद्रजींना खुलासा मागण्याची? शेवटी तू बाजारु विचारजंतच, तुझी पात्रता तेवढ्याच डबक्यात राहणार,” अशी टीका जगदीश मुळीक यांनी केली. यावर आता अमोल मिटकरी यांनी मुळीक वळवळ करु नको, थोबाड बंद कर, असे म्हणत पलटवार केला आहे.
हेही वाचा
अधिक पाहा..