Vidarbha Weather Update : नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने (Heavy Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जलमयस्थिती निर्माण झाली असून अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, अनेकांच्या शेतातील हातातोंडाशी आलेला भात पीक आणि इतर पिके जमीनदोस्त झाल्याचे चित्र आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील भंडार, गोंदिया, चंद्रपुर, गडचिरोलीसह आसपासच्या गावांना बसला आहे. तर अनेक गणेश मंडळात देखील पाणी शिरल्याचे बघायला मिळाले आहे. सोमवारपासून पावाचा जोर वाढल्याने अनेक गावांचा संपर्क तुटल्याचीही माहिती पुढे आली आहे. ऐकुणात या पावसाने सर्वत्र एकच दाणादाण उडवल्याचे चित्र आहे.
नदी पुलावरून डिझेल टँकर गेला वाहून, व्हिडिओ व्हायरल
गोंदिया जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, वाघनदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला असताना सुद्धा लोहारा जवळील वाघ नदीपात्रामध्ये एक डिझेलचा टँकर रस्त्यावरून गेला. दरम्यान हा डिझेलचा टँकर पाण्यात वाहून गेल्याच व्हिडिओ सध्या समाज मध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. वारंवार प्रशासनाने सतर्कतेच्या इशारा देऊनही या ट्रक चालकाने पुलावरून पाणी वाहत असताना आपला ट्रक टाकला आणि पाण्यामध्ये वाहून गेला आहे.
मोर्णा नदीपात्रात गेल्या 24 तासात दोन मृतदेह
दरम्यान, अकोल्यातल्या मोर्णा नदीपात्रात गेल्या 24 तासात दोन मृतदेह आढळून आले आहेत. यात एका 6 वर्षीय बालकाचा मृतदेह मोर्णा नदीच्या पाण्यात तरंगताना दिसून आलाय. या घटनेनंतर पुन्हा राजेश्वर सेतू पुलाजवळ एका 56 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळलाय. आढळून आलेल्या दोन्ही मृतदेहाचे अंतर हे अर्धा किमीपर्यत होतं. तर दोन्ही मृतकांची ओळख समोर आली असून 6 वर्षीय बालकाचे नाव दुर्गेश अनिल भालेराव असल्याचे समोर आले आहे. ज्याची बेपत्ता असल्याची तक्रार आधीच पोलिसांकडे दाखल होती. तर दुसऱ्या घटनेतील राजेश्वर सेतू पुलाजवळ आढळलेला मृतदेह सिंधी कॅम्प येथील लक्ष्मण मोहन ढोकणे यांचा असल्याची माहिती समोर आलीय. सध्या अकोला पोलीस या प्रकरणांचा तपास करत असून, मृत्यूच मूळ कारणाचा तपासही पोलीस शोधत आहेत.
रुग्णालयात शिरले पुराचा पाणी, साहित्याचं नुकसान
गोंदिया शहरात सोमवारच्या रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. गोंदिया शहरातील खाजगी सहयोग रूग्णालयमध्ये देखील पावसाचे पाणी शिरले असून यामुळे रुग्णालयातील साहित्याची नासधुस झालेली आहे. तर सरकारी बाई गंगाबाई रुग्णालयात देखील पाणी शिरल्याची माहिती पुढे आली आहे. या दोन्ही रुग्णालयात पाणी शिरल्याने रूग्णालय प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
पुरात अडकलेल्या तीन लोकांना वाचविण्यात यश
दुसरीकडे पुरात अडकलेल्या तीन लोकांना वाचविण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी तिन्ही लोकांना रेस्क्यू करून बाहेर काढले आहे. देवरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने देवरी तालुक्यातील शिरपूर धरणाचे दरवाजे सातही दरवाजे हे साडेतीन मीटर उंचीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वाघनदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे आणि अशाच परिस्थितीत शिरपूर जवळील गावात पुरात दोन पुरुष आणि एक महिला हे अडकले होते त्यांना वाचविण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम ही दाखल झाली असून या तीनही पूर पिडीताना वाचवण्यात यश प्राप्त झाले असून यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..