अकोला : विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असून छाननी प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. आयोगाच्या तारखेनुसार 30 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज छाननी होऊन बाद उमेदवारांची नावे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. त्यात, अकोला (Akola) जिल्ह्यात चक्क मनसेच्या उमेदवाराचाच अर्ज बाद झाल्याने चांगलाच गोंधळ उडाला आहे. या घटनेनंतर, जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा असून, आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही संबंधित उमेदवारावर केला जात आहे. त्यातून, त्यांच्या मनसे (MNS) कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या उमेदवारी अर्ज फेटाळलेल्या उमेदवार प्रशंसा अंबेरे यांचं कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडलं. अर्जाच्या छाननीत काल वय 25 दिवसांनी कमी असल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला गेला होता. त्यामुळे, मनसे पक्षाकडून आता काय कारवाई केली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

अकोल्यातील डाबकी रोड भागातल्या आठवडी बाजार चौकात अंबेरे यांचं कार्यालय आहे. अंबेरे यांनी विरोधी उमेदवारांशी हातमिळवणी करून जाणीवपूर्वक आपलं वय कमी असल्याची बाब लपवल्याचा आरोप आता मनसेच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. मनसेचे शहर उपाध्यक्ष अविनाश मुरेकर आणि इतर कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून ही तोडफोड केल्याची माहिती आहे. उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या प्रकारात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेनंतर घटनास्थळावर पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. मात्र, येथील मतदारसंघात मनसेचा उमेदवार अपात्र ठरल्याने मनसैनिक व मनसे पक्षासाठी हा मोठा झटका आहे.

दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं राज्यातील बहुतांश मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. राज ठाकरे यांनी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र दौरा केला होता. त्यावेळी, काही उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर, निवडणुकांची घोषणा होताच मनसेकडून याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, अकोला मतदारसंघातून प्रशंसा अंबेरे या युवतीला उमेदवारी देण्यात आली होती.

हेही वाचा

पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा

 

 

अधिक पाहा..



Source link