Devendra Fadnavis Press Conference; राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेचं काय होणार असा प्रश्न लाभार्थी महिलांना पडला आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं आहे. लाडकी बहीण योजना सुरु राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच निकषाबाहेर कोणी फायदा घेतला असेल तर पुनर्विचार केला जाईल असंही स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदी असताना नेमकं कोणत्या गोष्टींवर लक्ष असेल यासंदर्भातही सांगितलं.
लाडकी बहीण योजनेबद्दल विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ही योजना सुरुच ठेवणार आहोत. 2100 देखील देणार आहोत. बजेटच्या वेळी त्याचा विचार केला जाईल. आपले आर्थिक स्त्रोत पाहून पडताळणी होईल. पण आम्ही जी आश्वासनं दिली आहेत ती सगळी पूर्ण करु. त्यासाठी ज्या व्यवस्थांची गरज आहे त्या निर्माण करु. जर निकषाच्या बाहेर कोणी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याचा पुनर्विचार केला जाईल. तशा काही तक्रारी आल्या आहेत”.
संध्या. ७.२८ वा. | ५-१२-२०२४ मुंबई.
LIVE | पत्रकार परिषद#Maharashtra #Mumbai https://t.co/gIXUT0Jczp
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 5, 2024
“मोदींनी शेतकरी सन्मान योजना सुरु केली तेव्हा लाभार्थ्यांमध्ये अनेक मोठे शेतकरी असल्याचं समोर आलं होतं. नंतर छाननी झाली असता अनेकांनी आपण निकषात बसत नाही सांगत माघार घेतली होती. नंतर ती योजना स्थिर झाली अशी आठवणही त्यांनी सांगितली. अशाप्रकारे लाडकी बहीण योजनेत निकषाच्या बाहेर बसणाऱअया बहिणी मिळाल्या तर पुनर्विचार करु. पण सरसकट पुनर्विचार करण्याचा विषय नाही,” असंही त्यांनी सांगितलं.
“आमच्या भूमिका बदलल्या असल्या तरी दिशा, गती, समनव्य तोच राहणार आहे. त्यामुळे यात वेगळेपण पाहायला मिळणार नाही,” असं त्यांनी सांगितलं. “पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अधिकाऱ्यांना सांगितलं की, मागच्या काळात 50 ओव्हरची मॅच होती. नंतर अजित पवार आले आणि 20 ओव्हरची मॅच झाली. आता कसोटी सामना आहे. त्यामुळे नीट धोऱणात्मक निर्णय घेत राज्याला पुढे न्यायचं आहे. ज्या योजना सुरु केल्या आहेत, पायाभूत सुविधा, नदीजोड प्रकल्प, वेगवेगळे निर्णय पुढे सुरु ठेवायचे आहेत. आमच्या वचननाम्यात, जाहीरनाम्यात जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण कऱण्यासाठी पावलं उचलायची आहेत. दिलेली सर्व आश्वासं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. एक लोकाभिमुख सरकार, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं सरकार पुढेही पाहायला मिळेल. योग्य मार्ग काढत मार्गक्रमण करु असा विश्वास आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
पुढे त्यांनी सांगितलं की, “पुढचं राजकारण वेगळं असेल. बदल्याचं राजकारण न करता बदल दाखवेल असं राजकारण करायचं आहे. विरोधकांच्या संख्येवर त्यांचं मूल्यमापन करणार नाही. योग्य विषय मांडले त त्याला योग्य सन्मान देऊ. स्थिर सरकारची 5 वर्षं पाहायला मिळतील. जे बहुमत दिलं आहे त्यानंतर लोकांचीही स्थिर सरकारची अपेक्षा असेल”.
“विधानसभा अध्यक्षांची निवड अधिवेशनात करु. शपथ झाल्यानंतर अध्यक्षांची निवड करावी लागते. यानंतर राज्यपालांचं अभिभाषण होईल. 7,8,9 ला विशेष अधिवेशन होणार आहे. 9 ला ही शपथ घ्यावी, 9 ला विधानसभा अध्यक्षांची निवड करावी यासाठी प्रस्ताव पाठवला आहे,” अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करु असंही त्यांनी सांगितलं आहे.
सत्तास्थापनेसाठी झालेल्या विलंबाबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले, “याआधी 2004 मध्ये 12 दिवसांचा उशीर झाला होता, 2009 मध्येही 9 दिवसांची उशीर होता. युतीचं सरकार असताना निर्णय घेताना दिरंगाई होते. एकच पक्ष असताना फार वेळ लागत नाही. खाती वाटपाबद्दल जवळपास निर्णय झाला आहे. मागील जे मंत्रिमंडळ होते त्यात थोडे फार बदल होतील, पूर्ण बदल होणार नाही”
‘काही गोष्टी डोक्यात आहेत. दोन्ही मित्रांशी चर्चा करणं बाकी आहे. सध्या माझं लक्ष नदीजोड प्रकल्प सुरु झाला यावर आहे. सौरऊर्जेचे प्रकल्प, ज्यामध्ये रोजची डिलिव्हरी सुरु आहे. 2026 पर्यंत 16 हजार मेगाव्हॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. ही शाश्वत विकासाची कामं आहेत. यातील प्रत्येकाचा नीट फॉलो अप करावा लागतो. प्रक्रिया अधिक चांगली करण्याचा प्रयत्न असेल,” असंही ते म्हणाले आहेत.
शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरेंना स्वत फोन करुन निमंत्रण दिलं. प्रत्येकाने माझं अभिनंदन करत शुभेच्चा दिल्या. व्यक्तिगत कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. महाराष्ट्रात राजकीय संवाद संपलेला नाही. काही राज्यात दोन पक्षांमध्ये इतका विसंवाद असतो की खून के प्यासे म्हणतो तसं असतं. ते महाराष्ट्रात नाही, पुढेही नसावं,” अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.