Satish Bhosale Beed: मागील अनेक दिवसांपासून फरार असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. खोक्याच्या अटकेसाठी बीडच्या शिरुरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. तसंच खोक्यांनी केलेल्या गुन्ह्यात सुरेश धसांना सहआरोपी करण्याची मागणी देखील मोर्चातून करण्यात आली आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या अटकेसाठी शिरुर बंदची हाक देण्यात आला होती. हाक देत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. मागील अनेक दिवसांपासून खोक्या भाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसंच त्याच्यावर विविध कलमाअंतर्गत गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. तरीही आरोपी खोक्याला अजून अटक करण्यात अपयश का आले? असाही सवाल मोर्चेकरांनी केलाय. तसंच खोक्या हा सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्यानं सुरेश धसांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काय आहेत आंदोलकांच्या मागण्या?
राजकीय वरदहस्तानं खोक्या आणि त्याच्या सहका-यांचा वन्यजीवांच्या तस्करीचा व्यवसाय आहे. आरोपींवर वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखलकरा ढाकणे कुटुंबाची पोलिसांनी तक्रार का घेतली नाही याची चौकशी करा. पोलिसांवर कुणी दबाव टाकला याची चौकशी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. आमदार सुरेश धस यांनाही सहआरोपी करावे, सतीश भोसलेचे आणखी कोणते अवैध धंदे आहेत याचा शोध घ्यावा.
सतीश भोसले उर्फ खोक्यानं आतापर्यंत 200 काळवीट तसंच 50 मोरांची हत्या केलीय असा आरोप मोर्चेकरांनी केला आहे. तसंच या वन्य प्राण्यांचं मांस खोक्या काही राजकीय नेत्यांना देत असल्याचा आरोप देखील मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून खोक्याचे प्रताप समोर येत आहेत. कधी खोक्या टेबलावर पैसे फेकतोय. तर कधी खोक्या डीजेच्या गाडीवर चढून पैशांची उधळपट्टी करतोय. तर कधी कारमध्ये पैशांचा माज करताना दिसतोय. खोक्यानं शिरुरमधील शाळेत जात विद्यार्थ्यांना धमकी दिल्याचा देखील व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात खोक्या हा विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी देतांना दिसतोय.
मागील काही दिवसांपासून फरार असलेल्या खोक्याला अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. तसंच खोक्याला लवकर अटक न केल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा हा मोर्चेकरांनी दिला आहे.