Maharashtra Weather News : देश पातळीवर हवामानात कैक बदल होत असून, या बदलांमुळं आता नेमका कोणता ऋतू सुरू आहे हाच प्रश्न नागरिकांच्या मनात घर करू लागला आहे. गेल्या 24 तासांतील हवामानाचा आढावा घेतल्यास शुक्रवारी एकाएकी सायंकाळच्या वेळी पावसाची सुरुवात झाली आणि परिणामस्वरुप राजस्थान, मध्य प्रदेश आणि दिल्लीमध्ये काही अंशी तापमानात घट नोंदवण्यात आली. 

सूर्यानं आक ओकण्यास सुरुवात केलेली असतानाच उत्तर भारतातील काही भागांमध्ये झालेल्या या पावसानं नागरिकांना किमान दिलासा मिळाला असला तरीही हा दिलासा फार काळ टिकून राहणार नाही ही वस्तूस्थिती. कारण, ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात या भागांमध्ये 14 ते 18 मार्चदरम्यान पुन्हा एकदा उष्णता वाढण्यास सुरुवात होईल असा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.

महाराष्ट्रात विदर्भाची सर्वाधिक होरपळ 

सहसा होलिका दहनानंतर उकाडा वाढण्यास सुरुवात होते अशी महाराष्ट्रात धारणा असून, सध्या हेच चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. कोकण पट्ट्यामध्ये तापमानवाढ झाली असतानाच विदर्भामध्ये पारा 40 अंशांच्या नजीक पोहोचल्यामुळं राज्यात सर्वाधिक होरपळ याच क्षेत्रात होत असल्याचं स्पष्ट होत आहे. इथं ब्रह्मपुरीमध्ये 42 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली असून, या आकड्यानं उन्हाळ्याच्या पुढील दिवसांच्या चिंतेत आणखी भर टाकली. 

दरम्यान, पुढील 24 तासांमध्ये ही स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जिथं चंद्रपूर, अकोला, नागपूर, वर्धामध्ये कमाल तापमानाच 1 ते 2 अंशांची वाढ अपेक्षित आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही उकाडा चांगलाच वाढला असून, नागरिकांना भर उन्हात घराबाहेर न पडण्याचा इशारा यंत्रणा देत आहेत. यामध्ये उत्तर महाराष्ट्र अपवाद ठरत असून, इथं अद्यापही पहाटेच्या वेळी काहीसा गारठा जाणवत आहे. दिवस माथ्यावर आल्यानंतर मात्र हा गारठा नाहीसा होऊन उष्ण वारे नागरिकांना घाम फोडताना दिसत आहेत. एकंदरच महाराष्ट्रावर सध्या तुरळक ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण असल्याचं दिसून आलं तरीही उष्मा मात्र वरचढ ठर्ताना दिसत आहे. 

देशाच्या दक्षिण किनारपट्टी क्षेत्रांमध्ये हीच स्थिती असून, समुद्राच्या पृष्ठावरूनही उष्ण वारे वाहत असल्यानं इथंही तापमान वाढीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. दरम्यान बाष्पीभवनाची प्रक्रिया आणि समुद्र क्षेत्रामध्ये वाऱ्याच्या दाबामध्ये सातत्यानं होणारे बदल पाहता तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मात्र पावसाचीही हजेरी दिसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  तिथं उत्तरेकडे हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये मात्र पावसानं हजेरी लावली असून, हवामान विभागानं या भागांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे, तर पर्वतीय भागांसाठी हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp