Santosh Deshmukh Case : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सीआयडी आणि एसआयटीने केलेल्या तपासात आरोपींबाबत माहिती गोळा केली जात आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सरपंच देशमुख याला झालेल्या मारण्यात तब्बल 56 जखमा अंगावर आढळून आल्या. ज्यात एक गॅसचा पाईप त्याची लांबी 41 इंच होती. त्यावर मूठ तयार करून हत्यार बनविण्यात आले. तसंच लाकडी दांडा तलवारी सारखे धारदार शस्त्र, चार लोखंडी रॉड, लोखंडी फायटर धारदार कत्ती वापरण्यात आली. त्यातील एक गॅस, पाच क्लस वायर, लोखंडी रॉड, लाकडी काठी, पांढऱ्या प्लास्टिक पाईपचे तुकडे स्कॉर्पिओ, स्विफ्ट गाडी आणि पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केली आहेत.
कोणाच्या हातात कोणतं शस्त्र?
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाण करताना त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले होते. आरोपींनी संतोष देशमुख यांना कत्तीने मारलं, फायटरने मारलं, 41 इंचाचा एक रॉड होता, त्याला करदोड्याने मूठ तयार करण्यात आली होती. या लोखंडी रॉडने संतोष देशमुख यांच्या अंगावर अनेक फटके मारण्यात आले. दरम्यान तपासामध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करताना कोणत्या आरोपीकडे कोणते शस्त्र होते, याची कबुली सुदर्शन घुलेने दिली आहे. सुदर्शन घुले याचा दोषारोप पत्रामधील जबाबात सत्य समोर आलं आहे.
काय म्हणाला सुदर्शन घुले?
उमरी टोल नाक्यावर सरपंचाची गाडी अडवल्यानंतर ड्रायव्हर साईटच्या काचेवर दगड सुधीर सांगळे यांनी मारला. तर त्यानंतर मी (सुदर्शन घुले) यांनी डाव्या बाजूचा दरवाजा उघडून सरपंच देशमुख यांना बाहेर खेचले. त्यावेळी मी (सुदर्शन घुले) याच्या हातात गॅस पाईप होता. त्याने मारहाण केली. प्रतीक घुलेच्या हातात लाकडी काठी, महेश केदारच्या हातात लोखंडी रॉड, जयराम चाटेच्या हातात कोयता, कृष्णा आंधळेच्या हातात क्लच वायरचा बंच होता. तर सुधीर सांगळेच्या हातात पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप होता. तर जयराम चाटेने त्याच्या हातातील कोयत्याने इंडिगो गाडीचा चालक शिवराज देशमुख याला धमकावले.
तसंच बळजबरीने मारहाण करत स्कार्पिओ गाडीत संतोष देशमुख यांना बसून अपहरण केले. त्यावेळी स्कार्पिओ गाडी सुदर्शन घुले चालवत होता. तर जयराम चाटे हा स्विफ्ट गाडी चालवत होता. अशी माहिती घुलेने संतोष देशमुख हत्येच्या वेळीची दिली.
जयराम चाटेच्या जबाबात सुग्रीव कराडचं नाव
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटेच्या जबाबात सुग्रीव कराड नावाचा उल्लेख आला आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सरपंच संतोष देशमुख आणि गावातील लोकांनी सुदर्शन घुले आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली होती. त्यामुळे वाल्मिक कराडची बदनामी झाली. म्हणून वाल्मिक कराडनं सुदर्शन घुले याला बदला घ्यायला सांगितलं होतं, असं जयराम चाटेनं आपल्या जबाबात म्हंटलं होतं. सुग्रीव कराड हा बीडच्या केज मधील रहिवासी असून तो देखील गुंड आहे. याआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्याबरोब त्याने काम केलं आहे. लोकसभा निवडणुकीत त्यानं खासदार बजरंग सोनवणेंना विरोध केला होता. मात्र आता सुग्रीव कराडने खासदार बजरंग सोनवणे यांचं नेतृत्व मान्य केल्याची चर्चा सुरू आहे.