Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोडचा पहिला टप्पा दक्षिण मुंबईत सुरु झाला आणि शहराच्या रस्ते मार्गानं सुरू असणाऱ्या प्रवासामध्ये एक नवा टप्पा सर करण्यात आला. मात्र आहा याच कोस्टल रोच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भातील एका वृत्तानं सर्वांच्याच चिंतेत भर टाकली आहे.
मुंबईतील कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कांदळवनातील 9 हजार झाडं तोडली जाणार आहेत. त्याच्या बदल्यात पर्यावरणाची झालेली हानी चंद्रपूरमध्ये वृक्षारोपण करून भरून काढण्याचा अजब मार्ग पत्करण्यात आला आहे. कोस्टल रोड प्रकल्पामुळे वर्सोवा ते भाईंदर दरम्यानच्या भागातील कांदळवने बाधित होणार आहेत. त्याची नुकसानभरपाई म्हणून चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळील परिसरात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपुरात वृक्षारोपण करण्याचा प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे, ज्यामुळं या निर्णयानं सध्या अनेकांच्याच भुवया उंचावल्या असून पर्यावरणस्नेही संस्थांनी या निर्णयाचा विरोध केल्याचं पाहायाला मिळत आहे.
विकासाच्या नावावर सध्याच्या घडीला समुद्रकिनारी भागात असणाऱ्या कांदळवनांची होणारी आणि झालेली हानी चंद्रपूरमध्ये वृक्षारोपण करून भरून काढण्याचा अजब मार्ग पत्करण्यात आल्यानं सध्या हा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान या कांदळवनांच्या अभावी होणारी हानी आणि त्यांचे दुष्परिणाम चंद्रपूरमध्ये झाडे लावून भरून कशी निघणार असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी वर्सोवा ते भाईंदर दरम्यानच्या विस्तारासाठी वर्सोवा ते भाईंदर या भागात असणाऱ्या कांदळवनतोडीवर पर्यायी मार्ग शोधत चंद्रपूरातील या प्रस्तावित वृक्षलागवडीला केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी देत भरपाई म्हणून वनीकरण करण्याची अटही घालण्यात आली. पण, इथं भौगोलिक क्षेत्रानुसार आणि हवामानानुसार वनांची रचना, वनस्पतीची विविधता आणि त्यांचे गुणधर्म या गोष्टी मात्र विचाराता न घेतल्या गेल्याचंच स्पष्ट होत आहे.
सदर निर्णयानंतर कांदळवनाच्या तोडीमुळं त्याचा पर्यावरणावर आणि मच्छीमार समाजाच्या उपजीविकेवर थेट परिणाम होणार असून, प्रत्यक्षात त्याची भरपाई कांदळवनं नसलेल्या ठिकाणी करून काय साध्य होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.