Raj Thackeray Birthday Devendra Fadnavis Message: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आज 57 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबाबरोबर बाहेर गेले असून ते आज कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत. एकीकडे राज यांचा वाढदिवस असतानाच दुसरीकडे त्यांचे पुतणे आदित्य ठाकरेंचाही वाढदिवस आहे. आदित्य ठाकरेंचा आज 35 वा वाढदिवस आहे. मागील काही आठवड्यांपासून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा असतानाच अनेक ठिकाणी या काका-पुतण्याला एकाच बॅनरच्या माध्यमातून बाजूबाजूला फोटो छापून मनसे आणि सेनेच्या कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्याचं दिसून येत आहे. मात्र या साऱ्या चर्चा आणि सेलिब्रेशनदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये राज ठाकरेंना दिलेल्या शुभेच्छाही चर्चेचा विषय ठरत आहेत. 

मनसेच्या रक्तदान शिबिराला ठाकरेंच्या नेत्या

मुंबईत राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित मनसे आणि ठाकरे गटाची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरतोय. मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी हजेरी लावली. या रक्तदान शिबिरात मनसे नेते संदीप देशपांडे देखील उपस्थित आहेत. एकीकडे मनसे नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना स्थानिक पाटील नेत्यांमध्ये वाढलेली जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे.

अचानक राज-फडणवीस भेट

मात्र वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच राज यांनी अचानक मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये एक तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे ठाकरे बंधु पुन्हा एकत्र येणार की युती फिस्कटणार अशी चर्चा असताना आज फडणवीसांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

फडणवीसांचा खास मेसेज आणि ग्रिटींग

फडणवीस यांनी सकाळी पावणेअकरा वाजता राज ठाकरेंसाठी एक खास मेसेज आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. फडणवीस यांनी केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरेंचा फोटो असलेलं खास शुभेच्छापत्र शेअर करण्यात आलं आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राज ठाकरेजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!” अशा शब्दांमध्ये राज यांना फडणवीसांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबईत नाहीत राज ठाकरे

11 जून रोजीच राज ठाकरेंनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन आपण वाढदिसवाच्या दिवशी मुंबईत नसू असं सांगितलं होतं. येत्या 14 जून 2025 रोजी म्हणजेच वाढदिवसाला आपली भेट होणं शक्य नाही. कारण या दिवशी मी सहकुटुंब मुंबईबाहेर जात असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. मी वाढदिवस साजरा करणार नाहीय का? काही विशेष कारण आहे का? तर असं कोणतचं  कारण नाहीय. याचे कोणतेही अर्थ काढू नका, असे आवाहनही त्यांनी केलं होतं. 





Source link