Maha Vikas Aghadi On Raj Thackeray: हिंदीच्या मुद्द्यावरुन तब्बल 19 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच राजकीय मंचावर दिसून आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने विरोधकांना आणि महाविकास आघाडीला बळ मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता राज ठाकरेंसोबत जाण्यात काँग्रेस तयार नसल्याचं चित्र दिसत आहे. उलट राज यांच्यामुळे महाविकास आघाडीतच बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे.
काँग्रेसचा एकही नेता मेळाव्याला नव्हता
मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीबाबत काँग्रेसमधील सूर काहीसा बदललेला आहे. राज्यातील आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत सूर पक्षात दिसून येत आहे. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला काँग्रेस वगळता इतर पक्ष उपस्थित होते. अगदी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड असे नेतेही हजर होते.
…म्हणून काँग्रेसचा राज ठाकरेंना नकार?
राज ठाकरेंबरोबर गेल्यास काँग्रेसच्या सर्वसमावेशक भूमिकेला छेद जाऊ शकतो, असे पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. दरम्यान, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ठाकरे बंधूंची युती असेल तिथे काँग्रेस वेगळी चूल मांडण्याची दुसरी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
एकनाथ शिंदेच मराठी माणसाचे हृदयसम्राट’
शरद पवार गटाबरोबर आघाडी?
काही महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेसची समविचारी पक्ष असलेल्या शरद पवार गटाबरोबर आघाडी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर चर्चा करूनच घेतला जाणार आहे.
काँग्रेस नेत्यांचं म्हणणं काय?
निवडणुका नेमक्या कशा पद्धतीने लढवायच्या याची पक्षात चर्चा होईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. तर पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, “त्यांची मविआबरोबर लढण्याची तयारी असेल तर लढायचे की नाही हे ठरवू, ठाकरे बंधूंचे काय ठरते त्यानंतरच आम्हाला आमची भूमिका ठरवता येईल,” असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘शिंदेच मराठी माणसाचे हृदयसम्राट’
सत्तेत असूनही कॉमन मॅन सारखाच वागणारा नेता एकच, तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हीच सामान्यांची भावना आहे. आपल्या कामातून खऱ्या अर्थाने “मराठी माणसाचे हृदयसम्राट” बनले आहात, अशी भावना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली.