Jayant Patil Resign: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा अखेर जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर आज अखेर जयंत पाटील यांची ही मागणी पूर्ण झाली आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली असून 15 जुलै रोजी शशिकांत शिंदे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
मला प्रदेशाध्यक्षपदापासून मुक्त करा अशी मागणी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन सोहळ्यातच केली होती. मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते. त्यानंतर अखेर आज त्यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार झाले आहेत.
जयंत पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळत होते. त्यांच्या नेतृत्वात अनेक मोठ्या निवडणुका पक्षाने लढवल्या होत्या. काही ठिकाणी त्यांना यश आलं तर काही ठिकाणी अपयश आलं होतं. जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मला या पदापासून मुक्त करा, अशी विनंती केली होती. तेव्हापासूनच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नेते व माजी आमदारांच्या नावांची चर्चा होती. आमदार रोहित पाटील यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र शशिकांतत शिंदे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात हा मोठा बदल केला आहे. पक्षाची पूर्णतः जबाबदारी आणि विधानसभेचे अपयश भरून काढण्याची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्यावर असणार आहे. तसंच, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी ही मोठी घडामोड असल्याचे पाहायला मिळतेय.