अकोला : कापूस उत्पादनात (Cotton Cultivation) भारताला पुन्हा शाश्वत नेतृत्व मिळवून देणारा एक प्रयोग अकोल्यात आकाराला येतोये. सघन कापूस लागवड पद्धत असं या नव्या प्रयोगाचं नाव आहे. अनेक शेतकरी आता संपूर्ण देशाच्या कापूस धोरणाचा पाया बनणारा ‘अकोला पॅटर्न’ आकाराला आणतायेत. 11 जुलैला कोईम्बतूर येथे पार पडलेल्या भारतीय कापूस परिषदेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी 2030 पर्यंत 25 लाख हेक्टर क्षेत्रावर ‘अकोला पॅटर्न’ ने (Akola Pattern In Cotton Cultivation) कापूस लागवड राबवण्याची मोठी घोषणा केलीये. आता कपाशीचं भविष्य अकोल्याच्या मातीत लिहिलं जातंय, पाहूयात हाच ‘अकोला पॅटर्न’ नेमका काय आहे. 

जगात सर्वाधिक कापूस पिकवणारा देश म्हणजे भारत. पण उत्पादकतेच्या शर्यतीत मात्र आपण मागे आहोत. या संघर्षातूनच अकोल्यातल्या एका शेतकऱ्यानं एक नवा प्रयोग सुरू केला. ‘सघन कापूस लागवड पद्धत’ जिथं पारंपरिक एका एकरात 6 ते 7 हजार झाडं लावली जातात, तिथं अकोल्यातील दिलीप ठाकरे एकाच एकरात 30 ते 35 हजार झाडं लावून चक्क एकरी 18 क्विंटलपर्यंत कापूस घेताय. कपाशीला भरपूर जागा न देता, योग्य वाण आणि मोजक्या अंतरावर लागवड केली तर उत्पादनात मोठी वाढ होते. मी हे केलं, आणि देशभरात शेतकऱ्यांनी ते स्वीकारलं! असे मत दिलीप ठाकरे यांनी व्यक्त केलंय. 

देशभरात 25 लाख हेक्टरवर नेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न 

दरम्यान, दिलीप ठाकरे यांच्या या ‘सघन पद्धती’नं शेतकऱ्यांच्या उत्पादनात चमत्कारिक वाढ झाली. आज देशातील 9 राज्यांत, पंजाबपासून तेलंगणापर्यंत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हेच मॉडेल राबवतायत. याच यशामुळे त्यांची नियुक्ती केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या समितीवर झालीय. कापूस लागवडीच्या या अकोला पॅटर्नला  केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराजसिंग  यांनी मोठं बळ दिलंय. यावर्षी अकोला जिल्ह्यात 3 हजार हेक्टर क्षेत्रावर हा प्रयोग होतोय. पुढच्या हंगामात या पद्धतीने 50 हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड होणारेय. तर अकोला पॅटर्नने  कापूस लागवडीचं क्षेत्र देशभरात 25 लाख हेक्टरवर नेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. 

2030 पर्यंत देशभर 25 लाख हेक्टरवर अकोला पॅटर्ननं कापूस लागवड करणार आहोत. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा मार्ग इथून सुरू होतो. अशी प्रतिक्रिया केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिली आहे. 

सघन कापूस लागवड पद्धत नेमकी काय?

20cm x 20cm अंतराने झाडं
एकरी 29 ते 40 हजार झाडं
योग्य वाण निवड (उभट वाढ, बुटके, कमी अंतरात बोंडं)
एकरी 15-18 क्विंटल उत्पादन

पारंपरिक पद्धत:

6-7 हजार झाडं एकरी
4-5 क्विंटल सरासरी उत्पादन
पावसावर आधारित, अनिश्चितता

या पॅटर्नचा पुढचा टप्पा आता शास्त्रशुद्ध संशोधनाच्या आधारावर राबवला जातोय. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला – जे स्वतः या संशोधनाचा भाग बनून पुढील वर्षभरात 50 हजार हेक्टरवर सघन पद्धतीनं लागवड करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. शास्त्र, अनुभव आणि आधुनिक शेतीतंत्र या तिन्हीचा संगम ‘अकोला पॅटर्न’ आहे. विद्यापीठ स्तरावर याचं प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि बीजोत्पादन या सर्वांवर भर दिला जातोय. अशी प्रतिक्रिया अकोला पीडीकेव्हीचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी दिली आहे. 

शेतीतूनच समृद्धीची वाट जाते.दिलीप ठाकरेसारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभवातून, अकोल्यासारख्या जिल्ह्यांतूनच शाश्वत शेतीचं भविष्य आकार घेतंय. प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणातील ‘अकोला पॅटर्न’नंतर आता हा शेतीतला नवा ‘अकोला पॅटर्न’ येतोये. शेतीतील हा ‘अकोला पॅटर्न’ आता देशासाठी कापूस उत्पादनासाठी आशेचा एक नवा किरण ठरलाय. उत्पादन, उत्पन्न आणि प्रतिष्ठा या तिन्ही गोष्टी शेतकऱ्याच्या आयुष्यात परत आणण्याची क्रांती सुरू झालीय.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा



Source link