Akola News : रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी उपमुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेसोबत केलेल्या राजकीय युतीचे पडसाद आता आंबेडकर कुटुंबियात देखील उमटत असल्याचे पुढे आले आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे त्यांचे बंधू आणि वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) प्रचंड नाराज असल्याचे पुढे आले आहे. युतीची घोषणा करताना झालेल्या पत्रकार परिषदेतील आनंदराज आंबेडकरांच्या ‘संविधान कभी खतरे मे नही था’ आणि लाडकी बहीण योजनेची स्तुती करणाऱ्या वक्तव्यांवरून प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठी नाराजी असल्याची माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, 17 जुलैला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीत आनंदराज आंबेडकरांच्या (Anandraj Ambedkar) नव्या भूमिकेवर प्रचंड टीका होत असल्याचे ही पुढे आले आहे. वंचितच्या प्रदेश कार्यकारिणीने या परिस्थितीत एकमुखाने प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी असल्याचा ठराव संमत केलाय. आनंदराज आंबेडकरांच्या निर्णयामुळे रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांना वंचितमध्ये (Vanchit Bahujan Aaghadi) येण्याची ऑफर देखील आता देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिंदेसोबतच्या आघाडीच्या घोषणेनंतर आनंदराज आंबेडकरांना (Anandraj Ambedkar) विधान परिषदेचे आमदारकी आणि मुंबई महापालिकेत पाच ते सात जागा देण्यात येणार असल्याची माहिती ही आता सूत्रांनी दिली आहे.
प्रकाश आंबेडकरांची एकनाथ शिंदे संदर्भात आक्रमक भूमिका?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही ठिकाणी आंबेडकर आणि शिंदेंची शिवसेनेसोबत एकत्र येण्याबाबतच्या सर्व चर्चा आता थांबवण्यात आल्यात. मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर या महापालिकांसह विदर्भातील अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्हा परिषदेत दोन्ही पक्षांची एकत्र निवडणुका लढवण्यासाठी चाचपणी सुरू होती. यासंदर्भात वंचितचे नेते माजी आमदार नातिकोद्दीन खतीब आणि शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यात प्रत्यक्ष भेटून चर्चा ही झाली होती. मात्र एकनाथ शिंदेंनी आनंदराज आंबेडकरांसोबत केलेल्या आघाडीच्या घोषणेमुळे प्रकाश आंबेडकर प्रचंड नाराज झाले आहेत. परिणामी, पुढील काळात प्रकाश आंबेडकरांची एकनाथ शिंदे संदर्भात आक्रमक भूमिका राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा