Nagpanchami Special: आज नागपंचमी… सापांना पूजण्याचा दिवस! पण हेच साप जर घरात, अंगणात अचानक दिसले, तर बरेच जण थरथर कापतात, घाबरून जातात. काही जण तर अंधश्रद्धेच्या गर्तेत सापाला ठारही मारतात. पण अशा भीतीच्या वातावरणात अकोल्यात एक माणूस गेली 30 वर्षं सापांना वाचवतोय… नि:स्वार्थपणे, न थांबता, न थकता! कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करत, अपंगत्व झुगारून… जीव देणाऱ्या सापांना जीवदान देणाऱ्या या सर्पमित्राचं नाव बाळ काळणे.

30 वर्षांची निसर्गसेवा… 20 हजार सापांना जीवनदान

अकोल्यातील गोरक्षण रोड परिसरातील बाळ काळणे हे गेल्या तीन दशकांपासून सर्प आणि वन्य प्राणी वाचवण्याच्या कार्यात कार्यरत आहेत. नाग, घोणस, धामण, अजगर अशा विषारी आणि बिनविषारी सापांचे त्यांनी आतापर्यंत 20 हजारांपेक्षा अधिक रेस्क्यू केले आहेत. यात नुसतेच साप नव्हे, तर नीलगाय, सांबर, चितळ, बिबट, कोल्हा, लांडगा अशा अनेक वन्यप्राण्यांना सुद्धा त्यांनी योग्य काळजीपूर्वक पकडून नैसर्गिक अधिवासात परत सोडलं आहे.

“शेवटचा श्वासही साप वाचवत असताना घ्यायचा आहे…”

बाळ काळणे यांच्या शब्दांत एक विलक्षण समर्पण आहे. “हे काम माझ्यासाठी नोकरी नाही, ही माझी निसर्गसेवा आहे. शेवटचा श्वासही साप वाचवत असताना घ्यायचा आहे,” असं ते ठामपणे सांगतात. त्यांचं हे कार्य केवळ सेवा म्हणून नाही, तर एक ध्येय, एक जीवनमार्ग म्हणून त्यांनी स्वीकारलं आहे.

कॅन्सर, अपंगत्व, आणि तरीही थांबले नाहीत…

2018 मध्ये बाळ काळणे यांना जीभ आणि गळ्याचा कॅन्सर झाला. दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. त्यांच्या शरीराचं 79 टक्के भाग अपंग झाला. पण त्यांनी हार मानली नाही. कॅन्सरच्या उपचारांदरम्यान आणि त्यानंतरही त्यांनी सर्पमित्राची सेवा थांबवलेली नाही. उलट आज ते दुप्पट जोमाने या कामात झोकून देत आहेत. हे सर्व मोबदल्याशिवाय, विनाशुल्क केलेलं आहे.

त्यांच्या पत्नी दीपाली काळणे अभिमानाने सांगतात, “कॅन्सरनंतरही त्यांनी एक क्षणही विश्रांती घेतलेली नाही. त्यांच्या कामाचा आम्हाला अभिमान वाटतो.”

100 हून अधिक पुरस्कार… आणि जागतिक मान्यता

त्यांच्या या अद्वितीय सेवेसाठी त्यांना 100 पेक्षा जास्त पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. 2022 मध्ये ‘World’s Greatest Record’ कडून त्यांची जगभरात नोंद झाली. राज्य शासनानेही सलग तीन वेळा त्यांची ‘मानद वन्यजीव रक्षक’ म्हणून नियुक्ती केली आहे.

खरा सर्पमित्र… सर्पपूजेचा खरा अर्थ

आज नागपंचमीच्या दिवशी सर्पपूजा होत असताना, प्रत्यक्ष साप वाचवणारा, त्यांना अभय देणारा, आणि निसर्गासोबत नातं टिकवणारा बाळ काळणे यांच्यासारखा सर्पमित्रच या पूजेचा खरा प्रतिनिधी म्हणावा लागेल. त्यांचा संकल्प आहे – “मी शेवटच्या श्वासापर्यंत हे काम करणार. ‘एबीपी माझा’ या निस्वार्थ निसर्गसेवकाला सलाम करतंय!..बाळ काळणे यांचा प्रवास हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी धडा आहे… ध्येय, चिकाटी आणि संवेदनशीलतेचा!.. ‘नागपंचमी’च्या निमित्ताने अशा निरपेक्ष आणि निस्पृह काम करीत असलेल्या सर्पमित्रांना लोकाश्रयासोबतच राजाश्रय मिळणेही गरजेचे आहे.

आणखी वाचा



Source link