Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि त्यांचे थोरले बंधू राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तशी वातावरण निर्मितीही दोन्ही बाजूने तयार केली जात आहे. या दोन्ही सेनांच्या एकत्र येण्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील इनकमिंग मंदावल्याच्या बातम्याही समोर आल्या. मात्र या बातम्यांना खोडून काढणारा एक मोठा पक्ष प्रवेश गुरुवारी सायंकाळी एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घरी पार पाडला. या पक्षप्रवेशामध्ये काँग्रेसबरोबरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र या पक्ष प्रवेशादरम्यान एक नाव ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या, हे नाव होतं तेजस ठाकरे!
तेजस ठाकरे कोण?
एकीकडे ठाकरे एकत्र येत असतानाच एकनाथ शिंदेंच्या पक्षात तेजस ठाकरेंनी प्रवेश केल्याची घोषणा स्वत: एकनाथ शिंदेंनी केला आहे. ठाण्यात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं सांगताना एक यादी वाचून दाखवली या यादीमधील एक नाव तेजस ठाकरे असं होतं. आता हे तेजस ठाकरे तुम्हाला जे वाढले ते नाहीत. उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरेंच्या नावाशी साधर्म्य साधणारे त्यांच्याच पक्षातील यवतमाळमधील वरिष्ठ पदाधिकारी असलेल्या तेजस ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं आहे. मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थित यवतमाळमधील वेगवेगळ्या पक्षांमधील पदाधिकाऱ्यांचे प्रवेश गुरुवारी सायंकाळी ठाण्यात पार पाडले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंनीच या दुसऱ्या तेजस ठाकरेंचा उल्लेख करत ते ‘खऱ्या शिवसेनेत’ प्रवेश करत असल्याचं म्हटलं.
कोणीकोणी केला पक्षात प्रवेश?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या यवतमाळमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्याने नेरचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, सुनीता जयस्वाल, विनिता मिसळे तसेच माजी नगरसेवक संदीप गायकवाड, दिलीप मस्के, उबाठा अल्पसंख्याक आघाडीचे रिझवान खान, माजी नगरसेविका सरिता मुने, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लोकेश इंगोले, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका दर्शना इंगोले, राकेश नेमनवार, माजी नगराध्यक्ष संतोष बोडेवार, माजी उपसभापती अभय डोंगरे, विलास ठाकरे, राहुल देहणकर, साजिद शरीफ, अविनाश देशमुख, तेजस ठाकरे, रुपेश ठाकरे, अमोल जाधव, शुभम राठोड, निलेश भारती, विक्रम झाडे यांचा समावेश आहे.
घौडदौड अधिक मजबूत होईल
“अनेक सरपंच , अनेक जिल्हापरिषद सदस्य , माजी नगराध्यक्ष यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांचे स्वागत करतो,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “या सर्वांच्या प्रवेशामुळे संजय राठोड यांची विजयी घोडदौड सुरू आहे ती अजून मजबूत होईल. या सर्वांचा खऱ्या शिवसेनेत स्वगृही प्रवेश झाला हे मी जाहीर करतो,” असं शिंदेंनी पत्रकारांसमोर म्हटलं.
विश्वास सार्थ करणार
“जे अडीच वर्षात राज्यात काम झालं, विकास झाला, लाडकी बहीण लाडका भाऊ सर्वांना चांगले दिवस आणण्याचे काम सरकारने केलं. 232 जागा महायुतीला मिळाल्या. लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केले. सरकार येण्याचे स्वप्न ज्यांची होती त्यांचे स्वप्न धुळीस मिळवले. जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करणार. त्याच वेगाने त्याहीपेक्षा जास्त वेगाने महायुतीचा कारभार सुरू आहे,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
दररोज येणाऱ्यांचा ओढा वाढतोय
“दररोज शिवसेनेत येण्याचा ओढा आहे एका विश्वासाने ही सर्व येत आहेत. विविध जिल्ह्यातून लोक येत आहेत. महायुतीचा भगवा डौलाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत फडकेल. संजय राठोड यांचे अभिनंदन करतो. हे प्रेम सर्वांनी दिले आहे. हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून सार्थ करेल,” असं शिंदे म्हणाले.