नाशिक : आज राज्याच्या काही भागात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. गडचिरोलीत इमारत कोसळ्याची घटना ताजी असतानाच नाशिकमील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर छोटा हत्ती टेम्पोने शाळकरी विद्यार्थ्यांना धडक दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून10 ते 12 विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटीच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला आहे.
चांदवड येथील सोग्रस फाट्यावर एक गंभीर अपघात घडला आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या छोटा हत्ती टेम्पोने शाळकरी विद्यार्थ्यांना धडक दिली. या अपघातात एक विद्यार्थी ठार तर 10 ते 12 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळली आहे. जखमी विद्यार्थ्यांना तत्काळ उपचारासाठी चांदवड आणि पिंपळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मंत्री दादा भुसे मालेगावकडे जात असताना त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी मुंबई-आग्रा महामार्ग काही वेळ रोखून धरला. अपघातग्रस्त टेम्पो चालक दारुच्या नशेत असल्याची शक्यता असून पोलिसांनी घटनास्थळी हजर राहून तपास सुरू केला आहे.
एसटीच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अपघाताची घटना घडली आहे. सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटीच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोलगाव नाका येथे ही घटना घडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. चेहऱ्यावरून चाक गेल्यानं ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
नदीत वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याला गावकऱ्यांनी वाचवले
अकोल्यातल्या वाडेगावच्या निर्गुणा नदीपात्रात पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्याला सुखरूपपणे वाचवण्यात आलं आहे. पुरात अडकलेल्या व्यक्तीने एका छोट्या झाडाचा आधार घेतला होता. नदीपात्रातून जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि शेतकरी पुरात अडकला. त्याने मदतीसाठी एका झाडाचा आधार घेतला असल्याचे समजत आहे. दरम्यान, वाडेगाव ग्रामस्थांनी एकजुटीने अथक प्रयत्न अर्थातच रेस्क्यू करीत पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढले. गणेश रमेश ढोरे असं या शेतकऱ्याचे नाव आहे. ढोरे हे शेतीचं काम आटोपूट निर्घृणा नदीपात्रातून जात असतानाच अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि ते पुराच्या पाण्यात अडकले. याचवेळी ते एका छोट्या झाडाला घट्ट पकडून होते. स्थानिक ग्रामस्थांनी ट्यूब आणि दोरीच्या साह्याने रेस्क्यू करत सुखरूपपणे त्यांना बाहेर काढण्यात आले. जवळपास पाच ते सहा तरुणांच्या 20 मिनिट अथक प्रयत्नानंतर शेतकऱ्याला वाचवण्यात यश आलं आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी पहाटेपासून मोठा पाऊस झाला आहे. नदी, नाल्यांना पुर येत आहे. त्यामुळं नागरिकांनी नदी आणि पुलावरुन पाणी वाहत असताना कुणीही रस्ता ओलांडण्याचं धाडस करु नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
आणखी वाचा