UBT On Supreme Court Verdict: “भारत देशात भूक, असंख्य आजार, कर्जबाजारीपणा यामुळे माणसे मरत आहेत किंवा आत्महत्या करत आहेत, पण काही लोकांना या मरणाऱ्या बांधवांची चिंता नाही. त्यांना भूतदयेची उबळ येते व कबुतरे, भटकी कुत्री, मांजरी यांच्या जगण्याची, खाण्याची चिंता अस्वस्थ करते. कबुतरे आणि भटकी कुत्री यावरून मुंबई, दिल्लीत काही लोकांनी रान उठवले आहे. मुंबईतील कबुतरखान्यांमध्ये दाणे टाकू नयेत असे आधी उच्च न्यायालयाने व आता सर्वोच्च न्यायालयानेही बजावले तरी भूतदयावादी ऐकायला तयार नाहीत,” असा खोचक टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला तो काय त्याचे डोके ठिकाणावर नाही म्हणून?
“दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना कोणीही भूतदया दाखवू नये. या कुत्र्यांना मानवी वस्त्यांपासून लांब शेल्टर होममध्ये नेऊन टाका असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. भारतातील सर्वच शहरांत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. ही कुत्री अंगावर धावून जातात, चावतात. अनेकदा लचके तोडतात. लहान मुलांवर भयंकर हल्ला करतात. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनी तर अशा कुत्र्यांची दहशत घेतली आहे. कुत्रा चावल्यानंतर रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पाच वर्षांत दोन कोटींवर लोकांना कुत्रा चावला. त्यात हजारावर लोक मरण पावले. काहींना कायमचे अपंगत्व आले. हे चित्र चांगले नाही. मुंबईत सध्या कबुतरे विरुद्ध माणसांचा हा असाच संघर्ष सुरू आहे. शूर महाराष्ट्राला आपले प्राण वाचवण्यासाठी कबुतरांशी लढावे लागत आहे आणि एक समाज त्या कबुतरांच्या बाजूने नुसता उभा नाही, तर “प्रसंगी कबुतरांना दाणे घालण्यासाठी हाती शस्त्र घेऊन संघर्ष करू” वगैरे भाषा त्या समाजाचे धर्मगुरू वापरत आहेत. कबुतरांना दाणे घालण्यावरून मीरा-भाईंदर, मुंबईत दंगली झाल्या. कबुतरे मानवी आरोग्यास हानिकारक आहेत व त्यांना दाणे टाकू नयेत, कबुतरखाने बंद करावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला तो काय त्याचे डोके ठिकाणावर नाही म्हणून?” असा सवाल ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
धर्म आणि श्रद्धेची भावना किती?
“मुळात मुंबईत बैलघोडा इस्पितळ पारश्यांनी सुरू केले व कबुतरांना एकाच ठिकाणी येऊन खाता यावे यासाठी जागादेखील पारश्यांनीच दिल्या. त्यामुळे कबुतरांच्या भूतदयेबाबत एखाद्या समाजाचीच भूमिका असू शकत नाही. तेव्हा मुंबईची वस्ती विरळ होती. कबुतरांची संख्या कमी होती. कबुतरांनाही शिस्त होती. त्यामुळे चालून गेले. आता कबुतरांची लाळ, विष्ठा, पिसे यामुळे अनेक आजार होतात. कबुतरांच्या विष्ठेच्या संपर्कात राहणे हे फुप्फुसाच्या आरोग्यास हानिकारक आहे. कबुतरांमुळे लहान मुलांना गंभीर आजार होत आहेत व डॉ. सुजित राजन यांनी एका प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती उच्च न्यायालयास दिली. साठ वर्षांवरील वृद्ध, लहान मुले, महिलांमध्ये फुप्फुसाचे आजार वाढत आहेत. त्यास कबुतरांपासून होणारा संसर्ग कारणीभूत आहे. त्यामुळे मुंबईसारख्या शहरातील दाट मानवी वस्त्यांतील कबुतरखाने हलवावेत असे डॉक्टर मंडळींचे म्हणणे पडले व न्यायालयाने ते स्वीकारले. न्यायालयाच्या आदेशाचे पालन पालिका प्रशासनाने केले. कबुतरांना दाणे टाकल्याने भूतदयेचे पुण्य प्राप्त होते, अशी भूमिका जैन धर्मीयांनी घेतली. यात खरोखरच धर्म आणि श्रद्धेची भावना किती?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.
प्राण्यांवर दया दाखवणारे माणसांचे जीवन कस्पटासमान समजतात
“दुसऱ्या बाजूला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा असे सर्वोच्च न्यायालयाने बजावले. कुत्रा आणि हिंदू धर्मातील अनेक पंथांचे नाते आहेच. म्हणून “कुत्र्यांना पकडाल तर हाती शस्त्र घेऊ” वगैरे भाषा येथील नवहिंदुत्ववाद्यांनी केल्याचे दिसत नाही. श्री दत्तगुरूंच्या पायांशी श्वान म्हणजे कुत्रा आहेच, पण शिवाचा अवतार असलेल्या काळभैरवाचे वाहनसुद्धा कुत्रा आहे. काळभैरवाच्या या वाहनाविषयी हिंदू धर्मात मान्यता आहे. काळभैरवाच्या पूजेत काळ्या कुत्र्यास विशेष महत्त्व आहे. कुत्रा हाच काळभैरवाचा घोडा आहे असे सांगतात. तसे कोठे कबुतरांविषयी सांगितले आहे काय?” असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे. “पूर्वीच्या काळी कबुतरे पोस्टमनचे काम करीत. आता तसे नाही. त्यामुळे कबुतरे, कुत्रे यांच्यावरून सुरू झालेली भांडणे निरर्थक आहेत. प्राण्यांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी काम करणाऱ्या ‘पेटा’सारख्या संस्था आहेत. मनेका गांधी यांना देशभरातील भटकी कुत्री व हैदोस घालणाऱ्या माकडांची चिंता लागून राहिलेली आहे, पण दिल्लीत माकडे माणसांवर हल्ले करतात. माकडांचा चावादेखील जीवघेणा ठरतो. याचे कारण कबुतरे, माकडे, भटकी कुत्री यांच्याबाबत दया दाखवणारे माणसांचे जीवन कस्पटासमान समजतात. माणसांना चांगले जीवन जगता येत नाही. माणूस भुकेकंगाल, निकम्मा बनला आहे, मोदींच्या पाच-दहा किलो फुकट रेशनपाण्यावर भिकाऱ्यासारखा जगतोय,” असा उल्लेख लेखात आहे.
हजारो लोक वर्षाला कुत्र्या-मांजरांसारखे चिरडून मारले जातात त्याचे…
“रस्त्यावर आणि रेल्वे अपघातांत हजारो लोक वर्षाला कुत्र्या-मांजरांसारखे चिरडून मारले जातात त्याचे दुख ना सरकारला ना या भूतदयावाद्यांना. ‘माणसे मरोत, कुत्री-कबुतरे जगोत’ हा जीवनाचा नवा मंत्र म्हणजे गेल्या दहा वर्षांत निर्माण झालेली विकृती आहे. कबुतरांच्या खाण्यासाठी एक समाज हाती शस्त्र घेण्याची भाषा करतो. भगवान महावीरांच्या विचारात हिंसेला, अशा बेभानपणाला स्थान नाही आणि चावणाऱ्या कुत्र्यांनाही सरकारचे पाच किलो धान्य द्या, असे हिंदू धर्मात सांगितले नाही. तरीही आपल्या देशात धर्माच्या नावाने फालतू भूतदयेचा आविष्कार सुरूच आहे.
FAQ
सर्वोच्च न्यायालयाने कबुतरांबाबत कोणता आदेश दिला आहे?
सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे आणि कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. यामागचे कारण म्हणजे कबुतरांची लाळ, विष्ठा आणि पिसे यामुळे फुप्फुसांचे आजार, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांमध्ये, वाढत आहेत.
भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय आहे?
दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना मानवी वस्त्यांपासून दूर शेल्टर होम्समध्ये हलवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, कारण त्यांचा वावर वाढल्याने चाव्याच्या घटना आणि रेबीजमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
कबुतरांमुळे कोणते आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात?
कबुतरांची लाळ, विष्ठा आणि पिसे यामुळे फुप्फुसांचे गंभीर आजार होतात. डॉ. सुजित राजन यांच्या प्रत sworn affidavit नुसार, यामुळे लहान मुले, वृद्ध आणि महिलांमध्ये संसर्गजन्य आजार वाढत आहेत.
भटक्या कुत्र्यांमुळे कोणत्या समस्या उद्भवतात?
भटक्या कुत्र्यांचे हल्ले, विशेषतः लहान मुलांवर आणि सकाळच्या फिरस्तीला जाणाऱ्यांवर, वाढले आहेत. गेल्या पाच वर्षांत दोन कोटींहून अधिक लोकांना कुत्र्यांनी चावले असून, हजारो लोकांचा रेबीजमुळे मृत्यू झाला आहे, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.
शिवसेनेची या निर्णयांवर काय भूमिका आहे?
उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून या निर्णयांचे समर्थन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कबुतरे आणि भटक्या कुत्र्यांमुळे मानवी आरोग्याला धोका आहे, आणि यावरून धार्मिक भावना भडकवणे चुकीचे आहे. मानवी जीवनाला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.