Dattatray Bharne अकोला : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज विदर्भ दौऱ्याच्या निमित्ताने त्यांचे अकोला येथे आगमन झालंय. यावेळी रेल्वे स्थानकावर त्यांचे वारकरी बांधवांनी भव्य स्वागत केले. हा त्यांचा दोन दिवसांचा शासकीय दौरा असणार आहे. या दौ-यात ते विविध ठिकाणी भेटीगाठी देणार आहेत. मात्र घरात पंढरीची वारी असलेले शेतकरी आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वारकरी बांधवांकडून करण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या स्वागताने ते भावूक झाल्याचे बघायला मिळाले.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. तसेच दिवसभर उद्धघाटने, पाहणी, पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठक असा त्यांचा भरगच्च दौरा आहे. तसेच भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन, 15 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या हस्ते वाशिम कार्यालय येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. अशी माहिती पुढे आली आहे.

स्नेहाचं व भक्तीभावाचं ऊबदार आलिंगन आयुष्यभर स्मरणात राहील- दत्तात्रय भरणे

वारकरी संप्रदायातर्फे केलेल्या आगळेवेगळ्या स्वागताने कृषी मंत्री भारावून गेले. आता “शेतकऱ्यांचे पांडुरंग तुम्हीच आहात” स्वागत करतानाचे वारकरी बांधवांनी काढलेले उच्चार मंत्री दत्तात्रय भरणे भारावून गेले. भल्या पहाटे टाळ-मृदंग आणि अखंड “ज्ञानोबा माऊली, तुकाराम”च्या गजरात मिळालेलं हे स्नेहाचं व भक्तीभावाचं ऊबदार आलिंगन आयुष्यभर स्मरणात राहील असे ते म्हणाले. घरात पंढरीची वारी असलेला मी सुद्धा एक शेतकरी असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले.

विदर्भ नक्कीच सुजलाम सुफलाम होईल, अशी मला खात्री – दत्तात्रय भरणे

याप्रसंगी ते म्हणाले, “विदर्भातील शेतकरी वर्गाच्या पाठीशी मी नेहमीच खंबीरपणे उभा राहीन. योगायोगाने मी विदर्भातील वाशिमसारख्या कृषि समृद्ध जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने विदर्भाकडे येथून पुढील काळात माझे विशेष लक्ष राहील. विदर्भातील शेतकरी मेहनती व कष्टाळू आहे. त्यामुळे शेतक-यांचे कष्ट व शासनाची मदत यातून विदर्भ नक्कीच सुजलाम सुफलाम होईल अशी मला खात्री आहे.” असेही ते यावेळी म्हणाले.

याप्रसंगी हिंगणी बुद्रुक येथील श्री संत गुलाब बाबा संस्थानास ‘क वर्ग तीर्थक्षेत्र’ दर्जा मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम दातकर यांनी त्यांचे विशेष स्वागत केले. यावेळी आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

आणखी वाचा 

आणखी वाचा



Source link