Akola: एबीपी माझा’ने नुकतीच अकोला जिल्ह्यातील एका ध्येयवोड्या शिक्षकाची बातमी जगासमोर आणली होती. संतोष पाचपोर असं या शिक्षकाचं नाव आहेत. ते अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील निंबी खुर्द जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. द्विशिक्षकी असलेली आपली शाळा त्यांनी आपल्या सहकारी शिक्षक आणि गावकऱ्यांच्या मदतीनं शिक्षण अन उपक्रमामधून सर्वार्थाने सुंदर केली.
संतोष पाचपोर हे जिल्ह्यातील नामवंत बॉडी बिल्डरही आहेत. ‘माझा’च्या बातमीनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी शाळेला भेट देत स्थानिक विकास निधीतून शाळेसाठी 10 लाखांची घोषणा केलीय. यासोबतच ते त्यांच्या आमदार निधीतून शाळेला दोन संगणकही भेट देणाार आहेत. मिटकरींच्या भेटीवेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी व्हिडीओ कॉलवरून संवाद साधत त्यांचं कौतूक केलं. शाळेला सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन यावेळी शिक्षणमंत्र्यांनी दिलं आहे.
या शाळेत जगण्यातला सारं समृद्धपण विद्यार्थ्यांना मिळतंय. अन हे सारं तन्मयतेनं शिकविणारे असतात त्यांचे दोन शिक्षक… संतोष पाचपोर अन समाधान जावळे ‘गुरूजी’… त्यांच्या कामाची माझाने दखल घेतली अन शाळा राज्यभरात गाजलीय. गावकरी, शिक्षक, विद्यार्थी आणि आमदार अमोल मिटकरींनी एक चांगली शाळा समाजासमोर आणल्याने एबीपी माझाचे आभार मानले आहेत.
शिक्षणमंत्र्यांशी विद्यार्थी आणि शिक्षकांचा संवाद :
माझा’च्या बातमीनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी शाळेला भेट देत स्थानिक विकास निधीतून शाळेसाठी 10 लाखांची घोषणा केलीय. यासोबतच ते त्यांच्या आमदार निधीतून शाळेला दोन संगणकही भेट देणाार आहेत. मिटकरींच्या भेटीवेळी आमदार मिटकरींनी थेट राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना फोन लावत शाळेच्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी आमदार मिटकरींच्या फोनवरून शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी व्हिडीओ कॉलवरून संवाद साधत त्यांचं कौतूक केलं. शाळेला सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन यावेळी शिक्षणमंत्र्यांनी दिलं आहे. यावेळी आमदार मिटकरींनी विद्यार्थ्यांना आपल्याकडून शैक्षणिक साहित्यही भेट दिलं.
कशी आहे शाळा आणि शाळेतील शिक्षक :
शिक्षक म्हटलं की आठवतं शिस्त, ज्ञान आणि विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणारा मार्गदर्शक. पण जर तोच शिक्षक शारीरिक फिटनेसमध्येही झपाटलेला असेल, तर? अकोल्यातील संतोष पाचपोर हे नाव आज शिक्षण क्षेत्रातच नव्हे, तर फिटनेस आणि प्रेरणादायी कार्यासाठीही चर्चेचा विषय ठरत आहेत . अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील निंबी खुर्द या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळेतील पाचपोर सर यांनी ‘गुरुजी’ ही ओळख ‘रोल मॉडेल’च्या उंचीवर नेली आहे.
पहाटेचा जिम आणि सकाळची शाळा – एकाच वेळी दोन्ही क्षेत्रात शिस्त! :
संतोष पाचपोर सर यांचा दिवस पहाटे 4 वाजता सुरू होतो. 5 वाजता ते जिममध्ये व्यायामासाठी पोहोचतात. वजन प्रशिक्षण, पुशअप्स, सूर्यनमस्कार, कार्डिओ — कोणतीही कसर ठेवत नाहीत. त्यांच्या ट्रेनर करण रणपिसे यांच्या मते, “गुरुजींमधील सातत्य, मेहनत आणि सकारात्मकता कोणालाही प्रेरणा देईल.”
बॉडी बिल्डींग आणि शिक्षण क्षेत्रातलं ‘ध्यासपर्व’ : संतोष पाचपोर ‘गुरूजी’
संतोष पाचपोर. सहायक शिक्षक. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निंबी खुर्द, तालुका, बार्शीटाकळी, जिल्हा, अकोला. निंबी गावाची लोकसंख्या जेमतेम एक हजाराच्या घरात. तर पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळेत 21 विद्यार्थी. मात्र, हेच 21 विद्यार्थी या शाळेवरील शिक्षक संतोष पाचपोर अन समाधान जावळे यांचं संपुर्ण भावविश्व बनलेयेत. त्यातूनच, ही शाळा खऱ्या अर्थाने ‘मस्ती की पाठशाला’ बनली आहे. कारण, या शाळेत अनुभवातून दिलं जाणारं आनंदी शिक्षण आहेय. येथील विद्यार्थ्यांना खर्व, अब्जांशी नातं सांगणारी 27 अंकी संख्या अगदी लिलया वाचता येते. मराठी, इंग्रजी वाचता लिहिता येतं. छान कविताही म्हणता येतात. पाढे येतात. तर शाळेच्या मैदानावर विविध खेळांची धमाल असतेय. शाळेत झाडांना मोठं होत पाहण्याचा आनंद, शाळेतील परसबागेतल्या भाजीपाल्यातून शिजलेला शालेय पोषण आहारातील जेवणाचा आनंद. हे जगण्यातला सारं समृद्धपण या शाळेत विद्यार्थ्यांना मिळतंय. अन हे सारं तन्मयतेनं शिकविणारे असतात त्यांचे दोन शिक्षक. संतोष पाचपोर अन समाधान जावळे ‘गुरूजी’….
‘गवताळ माळरान’ ते ‘आदर्श शाळा’, गावकऱ्यांचा अभिमान
2018 मध्ये जेव्हा संतोष पाचपोर आणि समाधान जावळे या दोन शिक्षकांनी या शाळेची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा शाळेचं रूप ओसाड माळरानासारखं होतं. पण त्यांनी हार मानली नाही. स्वखर्चातून 5 लाख रुपये, आणि गावकऱ्यांकडून 1 लाखांची लोकवर्गणी गोळा करून त्यांनी परिसर फुलवला. त्यातच शासनाचाही 1 लाखांचा निधी मिळाला. अन शाळेचं रूपडं पालटलं. आज ही शाळा ‘मस्ती की पाठशाळा’ म्हणून ओळखली जाते. इथे पाढे, कविता, विज्ञान प्रयोग, इंग्रजी वाचनाबरोबरच सण, सृजनशील उपक्रम, परसबाग आणि खेळांची रेलचेल असते. कधीकाळी ओसाड असलेली शाळा आज विद्यार्थी, झाडं, फुलं, पक्षी, फळं अन पालेभाज्या किलबिलाट अन हिरवाईनं पार बदलून गेली आहे.
विद्यार्थ्यांचं यश, शाळेची भरभराट
या छोट्या गावातील विद्यार्थ्यांनी नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षा गाजवल्या. त्यांचे प्रातिनिधिक शिक्षणप्रयोग सोशल मीडियावर व्हायरल झाले. शाळेत शिक्षणासोबतच अनुभव आणि सण-उत्सव आणि खेळांना सारखंच महत्व दिलं जातं. त्यामुळेच शाळेत रंगपंचमी, दहिहांडी यासोबतच शनिवारी रनिंगचाआनंदही विद्यार्थी घेतात.. परसबागेतील केळीची चव त्यांना सुखावते. चांद्रयान प्रक्षेपणावेळी शाळेत शिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्यांना दाखविलेल्या प्रातिकृतिक यान प्रक्षेपण व्हिडीओला युट्यूबवर 25 कोटी लोकांनी पाहिल्यांनं ही शाळा अन दोन्ही शिक्षक देशभरात चर्चेत आले होते.
फिटनेससाठी झपाटलेला ‘गुरुजी’: तरुणांसाठीही आदर्श! :
आज संतोष पाचपोर यांचं व्यक्तिमत्व हे शिक्षकांपुरतंच मर्यादित नाही. ते तरुण बॉडी बिल्डर्ससाठीही आयडॉल झाले आहेत. शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे केवळ शरीर घडवणं नाही, तर मनही मजबूत करणं — हे त्यांचं जीवन शिकवून जातं.
‘बॉडी बिल्डर’ ते ‘नेशन बिल्डर’ : एक सामाजिक परिवर्तन
संतोष पाचपोर यांचा प्रवास हा केवळ शाळा आणि जिमपुरता मर्यादित नाही. त्यांनी एक समाज घडवण्याची चळवळ सुरू केली आहे. त्यांनी एक उदाहरण ठेवले आहे की एक शिक्षक, जर ठरवलं तर तो समाजाचा खऱ्या अर्थानं शिल्पकार होऊ शकतो.
सध्या राज्यातील जिल्हा परिषद शाळा शेवटच्या घटका मोजतायेत, हे दुर्दैवी वास्तव आहेय. मात्र या अंधारल्या वाटेवरही काही हसरे दुवे शोधणारे शिक्षक आजही एखाद्याा दीपस्तंभासारखं काम करतायेत. ‘बॉडी बिल्डर’ संतोष पाचपोर गुरुजी यांचं कार्य म्हणूनच कोणत्याही शब्दांच्या पलीकडचा ठरतं. ‘बॉडी बिल्डिंग’ ते विद्यार्थी घडविणाऱ्या ‘नेशन बिल्डिंग’ या संतोष पाचपोर गुरुजींच्या जगावेगळ्या ‘पॅशन’ला एबीपी माझाचा सलाम आणि शुभेच्छा!…..शिस्त, श्रद्धा आणि सेवाभाव यांच्या त्रिसूत्रीवर उभा राहिलेला हा ‘गुरुजी’ ‘बॉडी बिल्डर’ असतानाही खरा ‘नेशन बिल्डर’ ठरतो, यात शंका नाही…. ‘एबीपी माझा’चं समाजातील अशा सकारात्मक बदलांना ताकदीने पुढे आणण्याचं आणि उभं करण्याचं आपलं व्रत यापुढेही निरंतर असंच सुरू राहणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
आणखी वाचा