अकोला : देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस म्हणून गेल्याच आठवड्यात सुरू झालेल्या नागपूर-पुणे वंदे भारतला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तब्बल 12 तास प्रवास करणारी ही एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला गतीमान पद्धतीने जोडत आहे. मात्र, अकोला (Akola) जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर नागपूर-पुणे वंदे भारत (Vande bharat) एक्सप्रेस आज तब्बल 2 तास उभी राहिली होती. येथे मालगाडीचा खोळंबा झाल्याने वंदे भारत एक्सप्रेसमधील प्रवाशांची मोठी तारांबळ झाली असून तब्बल 2 तास उशिराने ही एक्सप्रेस आता पुढे धावत आहे. तर, ज्या रेल्वे स्थानकावर वंदे भारतला थांबा नाही, त्या रेल्वे स्थानकावर तब्बल 2 तास ही ट्रेन उभी होती. 

नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे महामार्गावर मालगाडीचे कपलिंग अचानक तुटले, आणि रेल्वेचे दोन भाग झाले. त्यामुळे, गार्डसह काही डबे मागे राहिले तर इंजिनसह उर्वरित डबे काही अंतरावर पुढे निघून गेल्याची घटना घडल्याने रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांना देखील आश्चर्य वाटले. वंदे भारतच्या या खोळंब्यामुळे पुण्यासह मुंबईकडं जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर देखील काही काळ परिणाम झाला होता. मात्र, वेळीच सुधारणा करण्याचं काम सुरू करण्यात आलं असून लवकरच रेल्वे वाहतूक पूर्ववत होणार असल्याची माहिती आहे. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. नागपूरहून अकोलाकडे जाणाऱ्या धावत्या मालवाहू रेल्वे गाडीचे डब्बे निसटले. मालगाडीचे कपलिंग अचानक तुटल्याने ही घटना घडली होती. मात्र, वेळीच हा प्रसंग लक्षात आल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

बोरगाव मंजू रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर पोल क्रमांक ५९९/१२ते ५९९/१२ नजीक धावत्या मालगाडीचे डब्बे निसटले होते. दरम्यान रेल्वे पायलटने प्रसंगावध राखत धावत्या रेल्वेचा वेग नियंत्रित केला. दरम्यान, नागपूरवरुन भुसावळ, मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर काही काळासाठी परिणाम झाला आहे. त्यामध्ये, वंदे भारत एक्सप्रेसलाही याचा फटका बसला. त्यामुळे, ज्या स्थानकावर वंदे भारतला थांबा नाही, त्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस तब्बल 2 तास थांबली होती. 

दरम्यान, अजनी (नागपूर) ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला वर्धा, बडनेरा, अकोला जंक्शन, शेगांव, भुसावळ, जळगाव,मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्डलाईन हे थांबे आहेत. अजनी ते पुणे दरम्यान धावणारी ही वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रासाठी मिळालेली 12 वी वंदे  भारत आहे.

बुलढाण्यातही रस्ते वाहतूक खोळंबली

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर परिसरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस बरसल्याने डोणगावजवळ कास नदीला मोठा पूर आला होता. त्यामुळे नागपूर मुंबई जुन्या महामार्गावरील वाहतूक चार तास बंद पडली होती. आता, पावसाचा जोर ओसरल्याने या महामार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

आणखी वाचा



Source link