Schools Holiday in Maharashtra: हवामान खात्यानं मुंबई, रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील 48 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसंच कोकणातही पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्याला पुढील चार दिवस असाच पाऊस बरसत राहील असा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने लोकांना खबरदारी घेण्याचे आणि गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई, ठाण्यासह अनके ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे. 

‘त्या’ शाळांना सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना

“जिथे मोठ्या प्रमाणात पाऊस आणि अतिवृष्टी सुरु आहे, तसंच रेड आणि ऑरेंज अलर्ट असतील त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर पूराची संभाव्य स्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टीचा निर्णय घ्यावा,” अशा सूचना विभागीय आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत. तसंच स्थानिक परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी आणि वेळप्रसंगी मुख्याध्यापकांनी निर्णय घ्यावा असं शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं आहे. 

 

कोणत्या जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, रायगडमधील शाळांना खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

– मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.  भारतीय हवामान खात्याने उद्या मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर क्षेत्रातील (मुंबई शहर आणि उपनगरे) सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुटी जाहीर करण्यात येत आहे.

– ठाणे महापालिकेने एक्सवर पोस्ट शेअर करत उद्या ठाण्यातील सर्व माध्यमांच्या शाळा बंद असतील असं जाहीर केलं आहे. “ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या, सर्व प्रकारच्या शाळांना दि..18 ऑगस्ट, 2025 आणि दि. 19 ऑगस्ट, 2025 रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे,” अशी माहिती एक्सवरुन देण्यात आली आहे. 

– पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, “पालघर जिल्ह्याला 19 ऑगस्टला अतिवृष्टीचा रेड अलर्टचा इशारा देणयात आला असून, सद्यस्थितीतीमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. याच कारणास्ताव जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर केली आहे. या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनचे काम करावे”.

– रायगडमधील शाळा महाविद्यालये उद्या बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी परिपत्रक जारी केलं आहे. उद्या रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट  असून, मुसळधार पावसाच्या शक्यतेने जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. 

 

FAQ

1) मुंबईत पावसामुळे शाळांना सुट्टी का जाहीर केली जाते?
मुंबईत मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि कमी दृश्यमानतेमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. यामुळे विद्यार्थ्यांचे संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि जिल्हा प्रशासन शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करते.

2) शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय कोण घेते?
मुंबईत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त (उदा., भूषण गगराणी) आणि ठाणे, पालघर, रायगड यासारख्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन किंवा स्थानिक महानगरपालिका (उदा., ठाणे महानगरपालिका) हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या आधारे सुट्टीचा निर्णय घेते. काहीवेळा स्थानिक पालकमंत्र्यांचे निर्देशही विचारात घेतले जातात, 

3) पावसामुळे सुट्टी जाहीर करण्यासाठी कोणत्या परिस्थितीचा विचार केला जातो?  
हवामान विभागाचा इशारा: रेड किंवा ऑरेंज अलर्ट, जे अतिमुसळधार पावसाची शक्यता दर्शवते.  
रस्त्यावरील पाणी साचणे: सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी आणि प्रवासातील धोका.  
लोकल ट्रेनची मंदावलेली सेवा: पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावते.  
विद्यार्थ्यांची सुरक्षितता: शाळेत येण्या-जाण्याच्या मार्गावरील अडचणी आणि जोखीम.





Source link