Akola/Raigad: अकोला आणि रायगड जिल्ह्यात सोमवारी दोन भीषण अपघात घडले. अकोल्यातील मूर्तिजापूरजवळ दुचाकी व एसटी बसचा समोरासमोर अपघात होऊन दुचाकीस्वार ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. तर रायगडमधील कशेडी घाटात पोलादपूरजवळ ट्रक पलटी होऊन चालक जखमी झाला. या दोन्ही अपघातांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अकोलयात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर सोमवारी सकाळी भीषण अपघात घडला. मूर्तीजापूरवरून अकोल्याकडे जाणाऱ्या दुचाकीची समोरून येणाऱ्या एसटी बसशी जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर सध्या मूर्तीजापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार महामार्गावर वेग आणि बेपर्वा वाहनचालकांमुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे बोलले जात आहे.

रायगडमध्ये कशेडी घाटात ट्रक पलटी

रायगड जिल्ह्यातील कशेडी घाटात पोलादपूर जवळील चोळई गावाजवळ सोमवारी दुपारी मालवाहतूक ट्रक पलटी होण्याची घटना घडली. गुजरात दिशेकडे माल घेऊन जात असलेला ट्रक चिपळूणवरून पोलादपूरच्या दिशेने येत होता. मात्र घाटातील वळणावर वाहनचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने पोलादपूर जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी आणि महामार्ग प्रशासनाने घटनास्थळी तातडीने पोहोचून ट्रक हटविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. यामुळे वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात येत आहे. कशेडी घाट हा अत्यंत अवघड आणि धोकादायक मानला जातो. त्यामुळे येथे वारंवार अशा अपघाताच्या घटना घडतात. स्थानिकांनी प्रशासनाला येथे अतिरिक्त सुरक्षेची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दोन्ही घटनांमुळे संबंधित जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महामार्गांवरील वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे वाहतूक सुरक्षेबाबत प्रशासनाकडून अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

आणखी वाचा



Source link