अमर काणे, झी मीडिया, नागपूर : (Nagpur Hit And Run Case News) विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पगडा दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगांवर दिसून येतो आणि आता तर पोलीस तपासातही AI चं योगदान पाहायला मिळत आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी AI माध्यमातून हिट अँड रनचा अवघड तपास झटपट करत गुन्हेगाराला अटक केली आहे.
AI तंत्रज्ञान अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून हिट अँड रन गुन्ह्याची गतिमान पद्धतीने ही उकल करण्यात आल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. अपघात करणाऱ्या ट्रक चालकाचा शोध कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून तब्ब्ल 700 किमीवरून करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच 10 ऑगस्टला नागपूर जबलपूर महामार्गावर अपघातानंतरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. नागपूर–जबलपूर महामार्गावर एक व्यक्ती आपल्या मृत पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन जात असल्याचा हा व्हिडिओ होता. एका ट्रकने कट मारल्यामुळे हा अपघात झाला होता, ज्यात बाईकवरस्वार ग्यारसी यादव नामक महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. मात्र, तिच्या पतीला अमित यादव याला रस्त्यात कोणत्याही वाहनचालकाकडून मदत न मिळाल्याने त्याला दुचाकीवरच पत्नीचा मृतदेह घेऊन जावे लागले होते.
अपघात नेमका कोणत्या ट्रकमुळं झाला याची काहीही कल्पना अमित यादव यांना नव्हती. मात्र त्या ट्रकवर लाल रंगाच्या पट्ट्या चितारलेल्या होत्या, ही बाब त्यांना आठवत होती. याच खुणेच्या आधारे एआयच्या मगतीनं काही मिनिटांतच पोलिसांनी त्या ट्रकची ओळख पटवली आणि सुमारे सातशे किलोमीटर दूर ग्वालियर–कानपूर हायवेवर या ट्रक चालकाला नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
AI च्या मदतीनं कसा मिळाला तपासाला वेग?
सत्यपाल राजेंद्र असे ट्रकचालकाचं नाव असून तो फर्रुखाबाद, उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी AI ऑपरेटेड सॉफ्टवेअरच्या मदतीने तपास केला. अपघात करणाऱ्या ट्रकचा सरासरी वेग (average speed) मिळवण्यात आला. त्यानंतर रस्त्यावरच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. अपघात करणारा ट्रक लाल रंगाचा असल्याचं स्पष्ट झालं.
त्याच मार्गावरील हायवे सीसीटीव्ही फुटेज AI च्या माध्यमातून स्कॅन करण्यात आलं. या प्रक्रियेत एकूण नऊ ट्रक आढळले. त्यानंतर या नऊ ट्रकचा वेग आणि लोकेशन तपासल्यानंतर आरोपी सत्यपाल राजेंद्र याचा शोध लागला. नागपूर ग्रामीण पोलिसांनी त्याला फर्रुखाबाद, उत्तर प्रदेश येथे अटक केली. या तपासात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराविषयी नागपूर ग्रामीण पोलिसांचे अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या कल्पनेतून पोलीस यंत्रणेला मिळालं नवं बळ
महाराष्ट्र सरकारने पोलिस तपासात आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील सर्व ताज्या तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर व्हावा, या उद्देशाने एक सरकारी कंपनी मार्वलची स्थापना केली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरील अभ्यासक्रम पूर्ण केलेले आय पी एस अधिकारी हर्ष पोद्दार यांची सी ओ पदावर नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे ‘ब्रेन चाइल्ड’ असून या मार्वल कंपनीद्वारे जगातील सर्वोत्तम एआय तंत्रज्ञानाचा वापर करून महिनोमहीने चालणारा तपास काही मिनिटांत पूर्ण केला जात आहे. आधुनिक पोलिसिंग मध्ये एआय चा यशस्वी वापर करणारी, ही देशातील पहिलीच अशी व्यवस्था आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणातील अनेक तासांची सीसीटीव्ही फुटेज AI मदतीने अवघ्या काही तासात माहितीचं परीक्षण आणि निरीक्षण करण्यात आलं आणि धडक मारणाऱ्या ट्रक ड्रायव्हरचा शोध घेण्यात आला.
FAQ
नागपूर हिट अँड रन प्रकरणात AI ने कशी मदत केली?
नागपूर ग्रामीण पोलिसांनी MARVEL (Maharashtra Advanced Research and Vigilance for Enhanced Law Enforcement) नावाच्या AI-संचालित सॉफ्टवेअरचा वापर करून सीसीटीव्ही फुटेजचं विश्लेषण केलं. यामुळे लाल रंगाच्या पट्ट्या असलेल्या ट्रकची ओळख पटवली गेली आणि 700 किमी दूर ग्वालियर-कानपूर महामार्गावर आरोपी सत्यपाल राजेंद्र याला अटक करण्यात यश मिळालं.
हिट अँड रन प्रकरण नेमकं काय होतं?
10 ऑगस्ट 2025 रोजी नागपूर-जबलपूर महामार्गावर एका ट्रकने मोटरसायकलला धडक दिली, ज्यामुळे ग्यारसी यादव या महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाला. तिच्या पतीला, अमित यादव, कोणतीही मदत न मिळाल्याने मृतदेह दुचाकीवर घेऊन जावा लागला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रकरणाला गती मिळाली.
AI ने तपास कसा गतिमान केला?
AI ने रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून लाल रंगाच्या पट्ट्या असलेले नऊ ट्रक ओळखले. त्यांचा सरासरी वेग आणि लोकेशन तपासून एका ट्रकची (UP 14 MT 2190) पुष्टी झाली. या प्रक्रियेमुळे 12 तासांचं फुटेज अवघ्या 12-15 मिनिटांत तपासलं गेलं.