Ajit Pawar Wardha Visit: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वर्धा दौऱ्यावर आहेत. अजित पवारांनी वर्धा दौऱ्यात जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हा परिषद, नगरविकास, कृषी व ग्रामविकास, जलसंपदा, वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा, पाणी व्यवस्थापन, जिल्हा वार्षिक योजना, सेवा ग्राम विकास आराखडा आणि रोजगार निर्मिती या विषयांवर सविस्तर चर्चा करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मात्र अजित पवारांच्या वर्धा दौऱ्यात एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

 

अजित पवार पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आटपून राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार नेते सुधीर कोठारी यांच्या घरी जेवणासाठी गेले असते. जेवणानंतर पुढील कार्यक्रमासाठी रवाना होत असता एका कार्यकर्त्याने ‘दादा आय लव्ह यू’ म्हटलं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर देत ”आय लव्ह यु टू” असे प्रत्युत्तर दिलं. यानंतर एकच हशा पिकला. सहकार नेते कोठारी यांच्या घरासमोर हे सर्व घडलं. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सुनेत्रा पवारांबद्दलच्या विधानाची चर्चा

अजित पवारांनी वर्ध्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना पत्नी सुनेत्रा पवारांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. पत्रकाराने अजित पवारांना, “राष्ट्र सेविका बैठकीला सुनेत्रा पवार गेल्या होत्या,” असं सांगत प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच, “मी विचारतो, मला माहित नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे कुठे जाते हे मला मिनिट टू मिनिट माहिती नसतं. आपण आत्ताच विचारलेलं आहे. मी आता विचारतो, का गं, कुठे गेली होती?” असं खोचक उत्तर अजित पवारांनी दिलं. 

आधी हात जोडले मग कपाळाला लावले अन्…

तसेच पुढे बोलताना अजित पवारांनी अगदी पत्रकारांसमोर हात जोडत, “काय खरंच ना…” असं म्हटलं. नंतर कपाळाला हात लावत, “तुमचा अधिकार आहे. मात्र काय आपण प्रश्न विचारावेत. अजित पवार वर्ध्यात आला आहे. आपल्या वर्ध्याच्या विकासाच्या दृष्टीने काय विचारता येईल ते दिलं सोडून कुठं अजित पवार काय म्हणेल, कुठं ब्रेकिंग न्यूज देता येईल. मग अजित पवार काय म्हणाला दाखवतील. मग तुमचं काय म्हणणं म्हणत समोरच्यांचं दाखवतील. काय चाललंय?” असा सवाल अजित पवारांनी विचारत नाराजी व्यक्त केली.

अजित पवारांनी यावेळी वर्ध्यात आम्ही विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही असा शब्द दिला. वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक प्रकल्प वेळेत व दर्जेदार पद्धतीनं पूर्ण व्हावा, यासाठी संबंधित यंत्रणांना काळजी घेण्याचे निर्देश अजित पवारांनी बैठकीत दिले. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती व सेवाग्राम विकास आराखड्याद्वारे सर्वसमावेशक प्रगती साधण्यावर आमचा भर असल्याचंही स्पष्ट केलं. 





Source link