Akola: वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांच्या मानाने पोळा हा सण साजरा केला जातो, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, महाराष्ट्रात एक आगळावेगळं ठिकाण आहे, जिथे बैल नाही, तर गाढवांचा पोळा साजरा होतो. गाढवांवरचं उपजीविकेचं ओझं वाहणारे लोक या मेहनती प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा पोळा साजरा करतात. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गाढवांचा पोळा मोठ्या उत्साहात पार पडतो आणि सजलेल्या गाढवांच्या या जल्लोषाला नागरिकांचीही मोठी उपस्थिती लाभते. अकोटमधील कुंभार समाजानं गेल्या 57 वर्षांपासून ही परंपरा सुरू केलीये.

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात पोळ्यानंतरचा दिवस गाढवांचा असतो. गेल्या 57 वर्षांपासून कुंभार व भोई समाज ही आगळीवेगळी परंपरा जोपासत असून, यंदाही रामटेकपूरा भागात गाढवांचा पोळा मोठ्या उत्साहात पार पडला. नखशिखांत नटलेले, सजलेले अन साज-श्रूंगारानं ‘हँडसम’ दिसत असलेले हे प्राणी आहेय तरी कोणते?… प्रश्न पडलाय ना… अहो ही गाढवं आहेयेत… ही सर्व गाढवं एका ठिकाणी जमलीयेत अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये…. पोळ्यासाठी… आज अकोटमधील रामटेकपूरा येथे गाढवांचा पोळा भरला होता

पोळ्यानंतरचा अनोखा जल्लोष

अकोटमध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गाढवांचा पोळा भरतो. गावातील कुंभार समाजाने ही परंपरा सुरू केली असून, काल रामटेकपूरा येथे गाढवांचा पोळा उत्साहात साजरा झाला. रंगीत कागद, कपडे, फुले, हारांनी सजलेली गाढवं पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. बैलांच्या पोळ्यात जसा साज-श्रृंगार केला जातो, तसाच साज या मेहनती गाढवांनाही चढवण्यात आला. 

गाढवांवर उदरनिर्वाह, 57 वर्षांची परंपरा

अकोट शहरातील जवळपास 200 कुटुंबांचा उदरनिर्वाह या गाढवांवर चालतो. वर्षभर माती, दगड, वाळू आणि लाकूड वाहून नेण्याचं काम ही गाढवं करतात. त्यामुळे त्यांच्या मेहनतीचं कौतुक करण्यासाठी हा पोळा साजरा केला जातो. या दिवशी मालक गाढवांची आरती करतात, त्यांना चांगलं खाऊ घालतात आणि या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. गेल्या 57 वर्षांपासून ही परंपरा सुरू असून, आजही ती तेवढ्याच श्रद्धेने साजरी होते. मालक आणि गाढवांमधील नातं केवळ श्रमाचं नाही, तर भावनिक आहे. “हे आमचं कुटुंबाचं सदस्य आहे, वर्षभर आमच्यासाठी राबतात, म्हणून आम्ही त्यांना मान देतो,” असं गाढव मालक चांगदेव चौरे यांनी सांगितलं. 

पोळ्यानिमित्त उचलला तब्बल 100 किलो दगड

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पाडळी येथे साजरा होणारा पोळा यावर्षीही चर्चेत राहिला. कारण इथे दरवर्षी पोळ्यानिमित्त एक आगळीवेगळी परंपरा पाळली जाते.पाडळी गावातील बुरा दिन बाबा दर्ग्याजवळ 100 किलो वजनाचा दगड ठेवलेला आहे. या दगडाला ‘शक्तीची कसोटी’ असे म्हटले जाते. परंपरेनुसार, पोळ्याच्या दिवशी 12 जण हा दगड केवळ बोटांच्या जोरावर उचलतात. प्रत्येक व्यक्ती फक्त एक बोट दगडाखाली लावतो आणि एकाच वेळी सर्वजण जोर देतात. आश्चर्य म्हणजे, नेमके 12 जण असतील तेव्हाच हा दगड जमिनीवरून उचलला जातो. बारापेक्षा एक जरी जास्त व्यक्ती झाली, तर दगड उचलता येत नाही, असा विश्वास ग्रामस्थांमध्ये आहे.

आणखी वाचा



Source link