अकोला : मनोज जरांगे यांचा मोर्चा हा सरकार पुरस्कृत आहे, मनोज जरांगेंची मतदारसंघात एक बैठक घेण्यासाठी आमदार त्यांना 10 ते 15 लाख रुपये देतात असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला ही व्यवस्था हाती घ्यायची आहे, नोकरशाहीत आपले लोक घुसवायचे आहेत असाही आरोप हाके यांनी केला. ते अकोला येथे माध्यमांशी बोलत होते.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची बीड जिल्ह्यातील मांजरसुंभ्यात एक निर्णायक बैठक पार पडली. या बैठकीवरून लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंच्या या बैठकीसह इतर बैठका या सरकार पुरस्कृत असल्याचं हाके म्हणाले. जरांगेंना आमदार पैसे देतात, यामुळेच मराठवाड्यातल्या छोट्या छोट्या गावातही जरांगेंची मोठमोठी बॅनर्स आणि पोस्टर्स लागल्याचे हाके म्हणाले.
केंद्रातील ओबीसी नेत्यांना साद घालणार
ओबीसीमध्ये आरक्षण घेऊन मराठा समाजाला व्यवस्था हातात घ्यायची असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय. आरक्षणाच्या माध्यमातून नोकरशाहीमध्ये आपली लोक घुसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील कोणत्याच नेतृत्वाकडून आता अपेक्षा नाही. त्यामुळे यासंदर्भात केंद्रातील ओबीसी नेत्यांना साकडे घालणार असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले.
मिटकरींना सोंगाड्याचं काम देण्यासाठी विनंती करणार
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवर हाकेंनी पुन्हा एकदा बोचरी टीका केली. मिटकरी हे फार मोठे व्यक्ती नाहीत. अमोल मिटकरी हे अजित पवारांनी विरोधकांवर भुंकण्यासाठी ठेवलेला कुत्रा असल्याचा प्रहार हाकेंनी केला.
बिग बॉसच्या घरात अमोल मिटकरी चार-पाच तासही टिकणार नाहीत, असा चिमटा हाकेंनी मिटकरींना काढला. तिथून बाहेर आल्यानंतर त्यांना काही काम उरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील काही तमाशा मंडळाना आपण त्यांच्यासाठी सोंगाड्या किंवा ढोलकीवाला म्हणून काम देण्यासाठी विनंती करणार असल्याचा टोला हाकेंनी मिटकरींना लगावला.
मुंबईत 29 ऑगस्ट रोजी आंदोलन
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जावी, सातारा आणि हैदराबादचे गॅझेट लागू करावे, 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया करावी यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरू होणार आहे. यावेळी मुंबईत येणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही असा पण मनोज जरांगे यांनी केला आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा