Akola News : अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील तळेगाव खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील एका शिक्षकाची बदली सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. गावकऱ्यांच्या नजरेत आदर्श ठरलेले शिक्षक प्रवीण चिंचोळकर यांची प्रशासकीय बदली झाल्याने अख्खं गाव अस्वस्थ झालं आहे. त्यांच्या जाण्याच्या विरोधात गावकरी अक्षरशः एकवटले असून “सर गेले, तर शाळाच बंद” असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे. चिंचोळकर गुरुजींनी गावातील शाळेला एक नंबर रूप दिलं आहे. त्यामुळे गावातील मुलांची एक पिढीत शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आल्याची गावकऱ्यांची भावना आहे.

गावातील मुलींचे ‘चिंचोळकर सर’

तेल्हारा तालुक्यातील तळेगाव खुर्द गावात जिल्हा परिषदेची मराठी प्राथमिक कन्या शाळा आहे. सातवीपर्यंत शिक्षण असलेल्या या शाळेत तळेगाव खुर्द, तळेगाव बुद्रुक आणि तळेगाव बाजार या तिन्ही गावातील मुली शिक्षण घेतात. या शाळेत गेल्या 8 वर्षांपासून चिंचोळकर सर या शाळेत कार्यरत आहेत. गावातील ही एकमेव मुलींची जिल्हा परिषदेची शाळा असून, त्यांच्या कार्यामुळे मुलींच्या शिक्षणात क्रांतिकारी बदल झाला आहे.

इंग्रजी संभाषणाचे स्वतंत्र वर्ग, शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा

गावकरी असलेल्या डॉ. मुकेश टापरे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलतांना भावुक होत सांगितले की, “सरांमुळे आमच्या मुली स्वप्न पहायला शिकल्यात. गुरूजींनी गावातल्या लेकरांना इंग्रजी बोलायला, मोठ्या ध्येयांसाठी झगडायला शिकवलं.”

मुलींच्या शिक्षणावर संकट

शाळेत केवळ चार शिक्षक कार्यरत होते. त्यातील तीन जणांची बदली झाली असून त्यात चिंचोळकर सरांचाही समावेश आहे. अशा स्थितीत मुलींच्या शिक्षणावर गदा येईल, अभ्यासाची घडी विस्कटेल आणि शाळेचं भवितव्य धोक्यात येईल, अशी भीती पालकांना वाटते आहे.

गावकऱ्यांची अधिकाऱ्यांकडे बदली रद्द करण्याची आर्त हाक 

गावातील ग्रामस्थांचा मोठा जमाव थेट जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांची भेट घेण्यासाठी अकोल्यात पोहोचला. याचबरोबर त्यांनी पालकमंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे आणि आमदार अमोल मिटकरी यांच्याशी देखील चर्चा करून आपली भूमिका स्पष्ट केली. गावकऱ्यांनी शिक्षणमंत्री, पालकमंत्री, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींनाही निवेदन दिले आहे. त्यांची मागणी एकच आहे… चिंचोळकर सरांची बदली तात्काळ रद्द करा, अन्यथा आम्ही शाळेलाच कुलूप ठोकू.”

गावकऱ्यांची शिक्षणावरील निष्ठा

ही लढाई फक्त एका शिक्षकासाठी नाही, तर शेकडो मुलींच्या भविष्याची आहे. चिंचोळकर सरांविना शाळा म्हणजे जणू घराविना घरच, असा गावकऱ्यांचा स्वर आहे. एक पालक सांगतात – “आमच्या लेकरांच्या शिक्षणाचा पाया सरांनी घातलाय. जर ते गेले, तर ही शाळा आमच्यासाठी शाळा राहणारच नाही.”

प्रशासनासमोर मोठं आव्हान

गावकऱ्यांच्या आर्त मागणीमुळे आता हा विषय प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि शिक्षण विभागापुढे गंभीर आव्हान बनला आहे. गावातील एकमेव मुलींच्या शाळेचे भविष्य, शेकडो विद्यार्थिनींची स्वप्नं आणि शिक्षणावरील गावाची निष्ठा जपण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी सर्वांची ठाम मागणी आहे. शिक्षक शाळेत परत आल्याशिवाय शाळा उघडणार नाही,” हा गावकऱ्यांचा आर्त स्वर आता प्रशासनाला ऐकावाच लागणार आहे. कारण हा प्रश्न फक्त एका शिक्षकाचा नाही, तर गावातील मुलींच्या उज्ज्वल भविष्याचा आहे. शासन आणि प्रशासन तळेगाव खुर्दवासियांची ही आर्त हाक ऐकते का?, आणि चिंचोळकर गुरुजींची बदली रद्द होते का?, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

आणखी वाचा

आणखी वाचा



Source link