Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशातून माघार घेतली असली तरीही महाराष्ट्राच्या काही भागांमधून मात्र पावसानं अद्यापही काढता पाय घेतला नाही. भर दिवसा, अगदी सूर्यकिरणांना दूर लोटूनही हे पावसाचे ढग येऊन क्षणात सारंकाही ओलंचिंब करून जात आहेत. ज्यामुळं आता ही रिपरिप अनेकांनाच नकोशी झाली आहे. त्यातच आजारपण आणि साथीच्या रोगांची भीती असल्यानं पावसानं आतातरी थांबावं असंच गाऱ्हाणं जो- तो घालताना दिसत आहे. मात्र पाऊस कोणापुढंही नमतं घेण्यात तयार नसल्याचं एकंदर परिस्थिती आणि हवामान अंदाज पाहता लक्षात येत आहे.
हवामान विभागाच्या (Mumbai Weather) मुंबई शाखेनुसार उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही दुर्गम भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी असेल असा प्राथमिक अंदाज आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असेल अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पुढील 24 तासांसह पुढील चार दिवसांसाठीही राज्यातील काही भागात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या भागात पावसाची शक्यता असून, रायगड, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्याच्या लातूर भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाची प्रणाली विरुन जात असतानाच राज्यात आता काही अंशी पावसाचा जोर ओसलण्यास सुरुवात झाल्यानं हे दिलासादायक वृत्त ठरत आहे. दरम्यान यामुळं तापमानात होणारे चढ – उतार मात्र टाळता येणार नाहीत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात बदलणारी वाऱ्याची दिशा आणि एकंदर चित्र पाहता त्यामुळं काही भागांमध्ये ढगाळ वातावरणाचीसुद्धा हजेरी असेल.
तापमानवाढ बेजार करणार; पण कुठं?
मान्सूननं एक्झिट घेऊनही हा पाऊस गेल्या आठवड्यापर्यंत राज्यात कोसळला, आता त्याचं प्रमाण कमी झालं असलं तरीही त्याची पूर्णत: माघार मात्र अद्यापही प्रतिक्षेत आहे. या विचित्र स्थितीमुळं पुढील काही दिवस तापमानात सातत्यानं चढ – उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये उकाडा वाढेल, दुपारच्या वेळी उष्मा अधिक भासेल असा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे, प्रत्यक्षात तापमान सरासरीइतकं असलं तरीही वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्यात वाढ झाली आहे असं कारण हवामान निरीक्षकांनी दिलं आहे.
FAQ
महाराष्ट्रात मान्सूनची माघार घेतली आहे का?
होय, मान्सूनने देशातून माघार घेतली आहे, परंतु महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अद्याप पावसाने पूर्णपणे माघार घेतलेली नाही. गेल्या आठवड्यापर्यंत पाऊस कोसळत होता आणि आता त्याचे प्रमाण कमी झाले असले तरीही काही भागांत हलक्या सरींची शक्यता आहे.
पावसामुळे लोकांना काय त्रास होत आहे?
सततच्या रिपरिप पावसामुळे लोकांना नकोशी वाटत आहे. आजारपण आणि साथीच्या रोगांची भीती असल्याने लोक पावसाने आता थांबावे असे गाऱ्हाणे घालत आहेत.
हवामान विभागाचा पावसाबाबतचा अंदाज काय आहे?
उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही दुर्गम भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी असू शकतो. पुढील 24 तास आणि चार दिवसांसाठी रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे पावसाची शक्यता आहे.