Ahmednagar : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे नेहमीच त्यांच्या विनोदी शैलीतून आणि वास्तवाशी निगडित भाषणातून लोकांना विचार करायला भाग पाडतात.  काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लेकीचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात कपड्यावरून ट्रोल करण्यात आलं. लेकीच्या साखरपुड्यामधील कपड्यांवर झालेल्या टीकेमुळे इंदुरीकर महाराज यांनी व्यथित होऊन कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे.

Add Zee News as a Preferred Source

मात्र, या प्रसंगानंतर सोशल मीडियावर काही लोकांनी अत्यंत अयोग्य आणि वैयक्तिक टीका करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मुलीच्या कपड्यांवर केलेल्या अश्लील आणि अनावश्यक कमेंट्समुळे महाराज मनोमन दुखावले गेले आहेत.

‘लोक खाली गेलेत… माझ्या मुलीच्या कपड्यांवर कमेंट्स करत आहेत’

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इंदुरीकर महाराज म्हणतात, ‘आमची पोरं लहान असताना आठ-आठ दिवस माझी त्यांच्याशी भेट होत नसे. मी लोकांसाठी धावत राहिलो. पण आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगावरच्या कपड्यांवर कमेंट्स करत आहेत. यापेक्षा वाईट काय असेल? चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या साखरपुड्याचे कपडे चर्चेत आहेत. पण तिच्या बापाला काहीही विचारत नाहीत’.

ते पुढे म्हणाले, ‘तुमच्याही मुली असतील. तिच्या कपड्यांवर कोणी बोललं तर तुम्हाला काय वाटेल? साखरपुड्यात कपडे मुलीकडून घेतले की नवरदेवाकडून? मग त्यावर माझा काय दोष? एवढी तरी लाज असावी ना! 31 वर्ष मी कीर्तन केलं, लोकांना प्रेरणा दिली, उपदेश केला पण आता मजा उरली नाही. 

लोकांच्या शिव्या खात खात आयुष्य गेलं पण आता हे व्यक्तिगत पातळीवर गेलं आहे. मी आजही समर्थ आहे उत्तर द्यायला पण कुटुंबावर बोट गेलं की सहन होत नाही’.  त्यांनी असंही स्पष्ट सांगितलं की ते काही दिवसांत एक व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध करून कीर्तन थांबवण्याचा औपचारिक निर्णय जाहीर करतील.

जनतेकडून सहानुभूतीची लाट

सोशल मीडियावर अनेकांनी इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘महाराज आमचं प्रेरणास्थान आहेत, त्यांनी कीर्तन सोडू नये’, असे अनेक लोक म्हणत आहेत. काहींनी सोशल मीडियावरील वैयक्तिक टीकेला आळा घालावा अशी मागणीही केली आहे.

इंदुरीकर महाराज हे केवळ कीर्तनकार नाहीत तर ग्रामीण महाराष्ट्राचं प्रतिबिंब आहेत. त्यांच्या शब्दांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे. पण वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींवरून केलेली टीका किती खोल जखमा करते हे या प्रसंगातून स्पष्ट झालं आहे.





Source link