Raosaheb Danve : जालना जिल्ह्यातील भोकरदन नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. लोकसभेतील पराभवानंतर रावसाहेब दानवे यांनी होमग्राऊंड असलेल्या भोकरदन नगरपरिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. एका वेळेचा अपवाद वगळता कधीही हाती न आलेल्या नगरपरिषदेसाठी दानवे यांनी जोरदार तयारी केली आहे. तर काँग्रेसकडून आपला गड कायम ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे. नेमकं काय सुरू आहे भोकरदनमध्ये पाहूयात सविस्तर 

Add Zee News as a Preferred Source

जालना जिल्ह्यात 3 नगरपरिषदांच्या निवडणूक होत आहेत. यामध्ये सर्वात लक्षवेधी लढत ठरत आहे ती भोकरदनची. कारण भोकरदन हा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं होमग्राऊंड आहे.  लोकसभेतील पराभवामुळे पक्षात काहीसे साईडलाईन झालेल्या दानवे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून ‘अभी तो मै जिंदा हूँ’ हा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे. 

भोकरदनमध्ये रावसाहेब दानवेंची प्रतिष्ठा पणाला 

इथे भाजपने शिवसेना-रिपाइंसोबत युती करत प्रचारात जोरदार आघाडी घेतलीय. भाजपने ज्येष्ठ कार्यकर्त्या आशा माळी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत मैदानात उतरवलंय. तसेच जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचा झेंडा फडकावणार असल्याचा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला आहे. 

भोकरदन नगरपरिषद ही 2001 ते 2005 अपवाद वळगता कधीही भाजपच्या ताब्यात नव्हती. त्यामुळे 20 वर्षानंतर पुन्हा दानवे यांनी ही नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. रावसाहेब दानवे यांचा मुलगा आमदार संतोष दानवे यांनी आपण केलेल्या विकासकामांचा दाखला देत मतदारांना साद घातली आहे. 

‘अभी तो मै जिंदा हूँ” चा संदेश प्रयत्न

भाजपने इथं कितीही जोर लावला असला तरी काँग्रेसचं पारडं जड मानलं जातं आहे. काँग्रेसने यावेळी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या सूनबाईलाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत रिंगणात उतरवलं आहे. जनता कायम आपल्या पाठीशी असल्याचं सांगत काँग्रेसने पुन्हा आपलीच सत्ता येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

लोकसभेतील पराभवानंतर रावसाहेब दानवे यांनी भोकरदनची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तसेच राजकारणात ”अभी तो मै जिंदा हूँ”चा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो आहे. नगरपरिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम दानवे यांच्याकडून होतं आहे. असं असले तरी दानवे यांच्या प्रयत्नाला किती यश मिळत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 





Source link