ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकींचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. 20 तारखेला होणा-या 24 नगरपरिषदांच्या मतदानांतरच निकाल जाहीर करण्याची याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती, त्यानंतर कोर्टानं 21 डिसेंबरला निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान या निर्णयानंतर विरोधकांनी थेट सरकारवर गंभीर आरोप केले आहेत..
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लांबणीवर गेल्यानं नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय. आज नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. मात्र, उद्या जाहीर होणार निकाल हा 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. कारण राज्यातील 24 नगरपरिषदांच्या निवडणुका
राज्य निवडणूक आयोगानं विविध कारणांमुळे पुढे ढकलल्या होत्या, 20 तारखेला या नगरपरिषदांसाठी मतदान होणार आहे, त्यामुळे दोन्ही टप्प्यातील मतमोजणी एकाच दिवशी म्हणजेच 21 डिसेंबरला होणार आहे.
4 नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगानं नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकींची घोषणा केली. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचं जाहीर केलं. मात्र, मतदानाआधी विविध कारणांमुळे राज्यातील 24 नगरपरिषदांच्या निवडणुका 30 नोव्हेंबरला पुढे ढकलण्याची घोषणा केली, 20 डिसेंबरला या 24 नगरपरिषदांसाठी मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं.
मात्र, 2 डिसेंबरला मतदानाच्या दिवशी दोन्ही टप्प्याचे निकाल एकाच दिवशी जाहीर करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं 21 तारखेला निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिलेत, त्यामुळे आता 21 तारखेला निकाल लागणार आहे.
निकाल पुढे ढकलल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर भाष्य केलंय. कोर्टाचा निर्णय मान्य करावा लागेल, मात्र, अशा पद्धतीनं निवडणूक आणि निकाल लांबणीवर जाणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तर काहीतरी सेटिंग राहिली असेल म्हणून निवडणूक पुढे ढकलल्याचा आरोप
निलेश राणेंनी केला आहे.
विरोधकांनी देखील या निर्णयानंतर नाराजी व्यक्त केलीय.. निकाल पुढे ढकलल्यानंतर विजय वडेट्टीवारांनी थेट सरकारवर निशाणा साधलाय. सत्ताधा-यांना मतचोरी करायची आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.. तर जयंत पाटलांनी देखील या निर्णयानंतर संशय व्यक्त केलाय..
नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला.. अगदी मतदानाच्या दिवशीही अनेक ठिकाणी राडे झालेत. त्यातच नागपूर खंडपीठानं दिलेल्या निर्णयानंतर उद्या जाहीर होणारा निकाल देखील आता 21 डिसेंबरला जाहीर होणार असल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे.