Maharashtra Weather News : तापमानाचा आकडा प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये 5 ते 6 अंशांवर पोहोचलेला असतानाच आता मात्र याच तापमानात वाढ होत असून महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. पहाटे आणि रात्री अतिशय उशिरा जाणवणारा गारठा वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी सूर्य डोक्यावर येताच कमाल तापमानाचा सरासरी आकडा 30 अंशांच्या घरात पोहोचत आहे. तर, काही भागांमध्ये ढगाळ वातावरणामुळं पावसाची हजेरी असण्याची शक्यता वाढवून जात आहे. ज्यामुळं पुढच्या 24 तासांमध्ये हवामानात हे अतिशय अनपेक्षित, बदल दिसून येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
का निर्माण झाली आहे हवामानाची ही स्थिती?
देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका सातत्यानं वाढत आहे, तर दक्षिणेकडे मात्र पावसासाठी पूरक स्थिती असल्यानं त्याचे थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानात दिसत आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये हवामान विभागानं सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला असून, त्याचा परिणाम प्रामुख्यानं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रावर होईल असं सांगण्यात येत आहे. तर, राज्यात घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्ये दाट धुक्याची चादर विरळ होण्यासाठी तुलनेनं अधिक वेळ घेईल, ज्यामुळं दृश्यमानतेवर याचा परिणाम होताना दिसणार आहे.
विदर्भात प्रामुख्यानं नागपूर, अमरावती, गोंदिया तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव इथं पुढील दोन दिवसांत 2 ते 3 अंशांची तापमान घट अपेक्षित असून, दक्षिणेकडील तामिळनाडू आणि केरळसारख्या राज्यांमध्ये मात्र पावसाची हजेरी दिसून येईल. लक्षद्वीपर आणि मालदीवमध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा या कृतीस कारणीभूत असेल.
एकाएकी कुठून आला पावसाचा इशारा?
चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळं अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे दाखल होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम कोकण, सिंधुदुर्गापासून सांगलीपर्यंत होण्याची शक्यता आहे. ज्यामुळं इथं वातावरण ढगाळ असेल, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये ढगांचा लपंडाव पाहायला मिळेल.
LOCAL FORECAST FOR MUMBAI CITY & NEIGHBORHOOD:
For 24 hours:
Haze during morning hours becoming mainly clear sky towards afternoon/evening.
Maximum & Minimum temperatures likely to be around 32 deg. C. and 19 deg. C. pic.twitter.com/Lwp1xT2Uev— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) January 5, 2026
हिमालय क्षेत्रात वाढणार हिमवर्षाव…
पश्चिमी हिमालय क्षेत्रांमध्ये बहुतांश भागांत ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. जम्मूपासून शिमल्यापर्यंत आणि पंजाबसह हरियाणा, राजस्थानच्या काही भागांर्यंत दाट धुकं पाहायला मिळेल. पर्वतीय भागांमध्ये दरम्यानच्या काळात हिमवर्षाव वाढणार असून, पुढील 7 दिवसांमध्ये तापमानात लक्षणीय घट होऊ शकते. पाऊस आणि हिमवर्षावामुळं या भागात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्यानं नागरिकांना यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.