MIM Alliance In Maharashtra : महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत युती, आघाडी यांनाही जोर चढलाय. भाजपने काँग्रेस आणि एमआयएमसोबत केलेली हातमिळवणी चर्चेत असतानाच, आता शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही एमआयएमशी युती केली आहे. परळी नगरपालिकेत गटनेता निवडीसाठी हे नवे समीकरण उदयास आलंय.
परळी नगरपरिषद गट नेत्याची निवड जिल्हाधिकारी बीड यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या गटनेतेपदी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आलीय. या गटात नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस 16 , शिवसेना – 2,एमआय एम – 1,अपक्ष – 4 अशा 24 जणांचा समावेश आहे.
या मित्र पक्षांमध्ये एमआयएमच्या नगरसेविका शेख आयशा मोहसीन यांचा समावेश असून उर्वरित सदस्यांमध्ये अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नगरसेवकांचा समावेश आहे. खरंतर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाच्या गटात मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह आरोप करत निवडून आलेल्या एमआयएमच्या सदस्याचा समावेश करण्यात आला आहे, पण आता या निर्णयाची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.
अकोट शहराच्या विकासासाठी भाजपला वगळून इतर कोणालाही पाठिंबा देण्याची एमआयएमची भूमिका
अकोट शहरात सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि एमआयएम यांच्यात झालेल्या युतीचा मुद्दा चांगलाच गाजला. या युतीवर जोरदार राजकीय टीका झाल्यानंतर आता ही युती तोडण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. एमआयएमच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र सादर करण्यात आलं असून, त्यामध्ये एमआयएमच्या उमेदवारांचा स्वतंत्र, नवा गट तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे तसेच अकोट विकास मंचमधून बाहेर पडत असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
या संदर्भात बोलताना एमआयएमच्या उमेदवारांनी सांगितलं की, अकोट शहराच्या विकासासाठी आम्ही तिसरी आघाडी तयार केली होती. मात्र, या आघाडीत भाजपचा समावेश असल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही या आघाडीतून बाहेर पडलो. एमआयएमचे नेते युसुफ पुंजांनी यांनी उमेदवारांना कारवाईचा इशाराही दिला होता.विचारधारा जुळत नसल्याने आणि विकासाला प्राधान्य देत आम्ही या युतीतून बाहेर पडलो, अशी प्रतिक्रिया एमआयएमच्या उमेदवारांनी दिली आहे. शहराच्या विकासासाठी भाजपला वगळून इतर कोणालाही पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. पक्षापेक्षा जनता मोठी आहे, त्यामुळे आम्ही थेट जनतेत जाऊन चर्चा करू आणि जनता जो फैसला देईल, तो आम्हाला आणि आमच्या पक्षाला मान्य असेल, असंही उमेदवारांनी सांगितलं आहे