Maharashtra Tourist Places Mysterious Temple: महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळं आहेत. याचबरोबर अनेक अशीही ठिकाणं आहेत जी लोकांना ठाऊक नाहीत. महाराष्ट्रातही अशी अनेक मंदिरं आणि गावं आहेत ज्यांच्याबद्दल लोकांना कल्पनाही नाही. मात्र या गावांमध्ये काही रहस्य दडलेली आहेत. ही रहस्य अजूनही उलगडलेली नाहीत. असेच एक रहस्यमय आणि रंजक मंदिर महाराष्ट्रात आहे. या मंदिरामधील मुर्तींवर हात फिरवला किंवा टीचकी मारली तर त्यातून सप्तसूर बाहेर पडतात. नाही आम्ही गमंत नाही करत आहोत खरंच महाराष्ट्रात असं एक मंदिर आहे. हे मंदिर कुठे आणि त्याचा इतिहास काय आहे जाणून घेऊयात…
कुठे आहे हे मंदिर?
ज्या मंदिराबद्दल आपण बोलतोय ते सोलापूरमध्ये आहे. जिल्ह्यातील वेलापूर येथे अगदीच दुर्लक्षित असलेलं हे मंदिर आहे अर्धनारीनटेश्वराचं! या मंदिरामधील मुर्तींसंदर्भात एक चमत्कारिक अनुभव घेता येतो. मंदिरातील बहुतांश मूर्ती या पुरातत्व खात्याने जवळच बांधलेल्या संग्रहालयात ठेवल्यात. याच संग्रहालयातील काही मुर्तींवर हात फिरवला किंवा टीचकी वाजवली तर त्यातून सप्तसूर निघतात. मात्र हे का होतं याचं कारण संशोधकांना अद्यापही सापडलेलं नाही. हे रहस्य आजही कायम आहे.
कसं आहे हे मंदिर?
खरं तर या ठिकाणी ऐतिहासिक वीरगळांचं संग्रहालय आहे. युद्धात धारातिर्थी पडलेल्या विरांच्या युद्धाचे प्रसंग या संग्रहालयातील वीरगळांवर कोरलेले दिसतात. या संग्रहालयातील वीरगळांची संख्या दिडशेहून अधिक आहे. येथील मंदिरात पाच हजार वर्षांपूर्वीच महादेवाची पिंड असून येथे पिंडीच्या ठिकाणी दागिन्यांनी नटवलेले अर्धनारीनटेश्वर आहेत. हेमाडपंथी पद्धतीनं हे मंदिर उभारण्यात आलं आहे.
नक्की वाचा >> महाराष्ट्रातील इटालियन हिल सिटी: मुंबई-पुण्यापासून अगदी जवळच आहे हे सुंदर ठिकाण; कसं जाल? कुठे राहाल?
वीरगळ म्हणजे काय?
वीरगळ हा शब्द दोन मूळ शब्दांपासून तयार झालेला आहे. ‘वीर’ म्हणजे शूर आणि ‘गळ’ म्हणजे दगड. त्यामुळे वीरगळचा अर्थ शूरवीरासाठी उभारण्यात आलेला दगड असा होतो. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, या वीरगळ परंपरेचा उगम कर्नाटकात झाला. त्यानंतर ती महाराष्ट्रात पसरली. महाराष्ट्रात राष्ट्रकूट, चालुक्य यांसारख्या राजघराण्यांच्या काळात वीरगळाचा प्रसार झाला. वीरगळ हे साधारणपणे तीन ते साडेतीन फूट उंचीचे दगड असतात. या दगडांवर योद्ध्याचे शौर्य, युद्ध, मृत्यू आणि देवलोकात जाण्याची प्रक्रिया कोरलेली असते. वर चंद्र आणि सूर्यही कोरलेले असतात. म्हणजेच चंद्र-सूर्य असेपर्यंत या वीराची क्रांती कायम राहील असं त्यातून सुचवण्याचा हेतू असतो. हे वीरगळ जुन्या गावांमध्ये, मंदिरांच्या परिसरात, पाराजवळ किंवा शेतात आढळतात. अनेकदा अशा वीरगळांवरील कोरीव काम हे देवाच्या मूर्ती समजून त्यांना शेंदूर लावून त्यांची पूजा केली जाते.
मंदिरावरील शिलालेखात काय?
1271 ते 1310 या काळात यादव राजा रामचंद्र याचे शिलालेख या मंदिराच्या भिंतीवर पाहायला मिळतात. मंदिरासमोरच पाण्याचं एक मोठं कुंड असून त्यात 12 महिने पाणी असतं. डाव्या बाजूला एक गोमुख असून पहिल्या पायरीवर एक शिलालेख कोरलेला आढळतो.
कधी असते यात्रा?
चैत्र पौर्णिमेला ग्रामदेवता असलेल्या श्री अर्धनारीनटेश्वराची यात्रा भरते. शुद्ध पंचमीला हळद, अष्टमीला लग्न आणि पौर्णिमेला वरात असते. वद्य अष्टमीला मुख्य सोहळा असं दरवर्षी येथे आयोजित केलं जातं.