Amit Thackeray On MNS Poor Performance In BMC Election: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई महानगरपालिकेमध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही. मनसेला दोन आकडी नगरसेवकही महापालिकेवर निवडून पाठवता आलेले नाहीत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करुन लढलेल्या या निवडणुकीमध्ये मनसेचे केवळ सहा उमेदवार निवडून आले आहेत. मराठी, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणारा यासारख्या भावनिक मुद्द्यांच्या आधारे निवडणुकीला सामोरे गेलेल्या ठाकरे बंधूंच्या हाती निराशाच पडली. या निकालाने मनसैनिकांना धक्का बसला असला तरी आता मनसेच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांना मानसिक आधार देण्याचं काम सुरु झालं असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंपाठोपाठ आता अमित ठाकरेंनीही मुंबई महानगरपालिकेच्या निकालावर भाष्य करताना एक शब्द दिला आहे.
माझं आणि तुमचं नातं फक्त…
अमित ठाकरेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मुंबईच्या निकालासंदर्भात एक पोस्ट केली आहे. “मराठी माणसासाठी आमचा लढा सुरुच राहील! निकाल काहीही असो… खंत एकाच गोष्टीची वाटते की, माझ्या मराठी माणसाला जे अपेक्षित होतं ते देण्यासाठी मला कदाचित अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. पण एक लक्षात ठेवा, माझं आणि तुमचं नातं फक्त एका ‘बटणापुरतं’ किंवा ‘मतापुरतं’ कधीच नव्हतं. राजकारणात जय-पराजय होतच असतो, पण माणसांची मनं जिंकणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे,” असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. ‘मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहील,’ अशी कॅप्शन देत अमित ठाकरेंनी एक पोस्ट शेअर केली आहे.
नक्की वाचा >> आदित्य ठाकरेंमुळे ठाकरे बंधूंनी मुंबई महानगरपालिका गमावली? ‘ती’ एक कृती ठरली कारणीभूत? खळबळजनक दावा
‘मराठी’ला आणि ‘मराठी माणसाला’ कधीच…
तसेच, “तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि साथ दिली, ती कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी आहे. माझा शब्द आहे तुम्हाला… सत्ता असो किंवा नसो, तुमच्या हक्कासाठी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक नेहमी धावून येतील. ‘महाराष्ट्र’ आणि ‘मराठी’ माणसाच्या हितासाठी आमचा लढा यापुढेही सुरुच राहील. खचून जाऊ नका… ‘मराठी’ला आणि ‘मराठी माणसाला’ कधीच एकटं पडू देणार नाही… हा शब्द आहे ठाकरेंचा!” असं अमित ठाकरेंनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हे विसरायचं नाही, राज ठाकरेंचं आवाहन
दरम्यान, यापूर्वी राज ठाकरेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मराठीसाठी लढत राहणार असल्याचं पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही,” असं राज यांनी म्हटलं आहे.