Pune News : 19 ते 23 जानेवारी दरम्यान  पुणे शहरात  आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. पुण्यातील अनेक प्रमुख रस्ते या स्पर्धेकरिता काही काळासाठी बंद ठेवले जाणार आहेत. या काळात विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ शकते. यामुळे विद्यार्थांना याचा फटका बसू नये म्हणून प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 19 जानेवारीला पुणे शहरातील प्रमुख भागांमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Add Zee News as a Preferred Source

19 जानेवारी 2026 रोजी पुणे शहरात सायकल रॅली पार पडणार आहे. या निमित्त जंगली महाराज आणि फर्ग्युसन कॉलेज रोडवरील वाहतूक आठ तास सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद राहणार आहे. दरम्यान शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आली असून, कार्यालयांना देखील शक्य असेल तर सुटी देण्यात यावी अथवा मेट्रो व अन्य पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

बजाज पुणे ग्रँड टूर 2026 आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा

बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणून मर्यादित न राहता पुढील अनेक पिढ्यांसाठी टिकून राहणारा पायाभूत आणि क्रीडा वारसा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  पुणे येथे आयोजित या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूरच्या शुभारंभ आणि आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या स्वागतप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सामजिक न्याय राज्य मंत्री माधुरी मिसाळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग मंचावर उपस्थित होते.

पुणे जिल्हा क्रीडा व पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नकाशावर येणार

पुणे जिल्हा हा इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, येथे प्रत्येक किलोमीटरवर शौर्य, परंपरा आणि संस्कृतीच्या कथा अनुभवायला मिळतील. पुणे हे सांस्कृतिक राजधानीबरोबरच तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी क्षेत्रातील अग्रगण्य शहर असून, पश्चिम घाटाचे निसर्गसौंदर्य  स्पर्धेला वैशिष्ट्यपूर्ण उंची देईल. ही स्पर्धा लवकरच जागतिक क्रीडा कॅलेंडरमधील प्रतिष्ठेची वार्षिक स्पर्धा बनेल, असा विश्वास व्यक्त करत, या माध्यमातून पुणे जिल्हा क्रीडा व पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नकाशावर ठळकपणे येईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही भविष्यातील अनेक शतकांसाठी टिकणाऱ्या मार्गाची सुरुवात असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, स्पर्धेसोबत विविध पूरक उपक्रम राबवण्यात येणार असून, पर्यटकांना निसर्गासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

‘यूसीआय’च्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल अशी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व रायडर्सनी  खिलाडूवृत्तीने स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन केले.  जगभरातील किमान 35 देशांमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय सायकलपटू, व्यवस्थापक, प्रशिक्षक  आणि सहकारी अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र शासनाच्यावतीने स्वागत करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पर्धेच्या भव्य आणि नेटक्या आयोजनासाठी पुणे जिल्हा प्रशासन व सर्व शासकीय यंत्रणांचे विशेष अभिनंदन केले. अत्यंत कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्पर्धेची तयारी पूर्ण करणे हे उल्लेखनीय असून ४३७ किलोमीटर लांबीचे रस्ते जागतिक दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेस अनुरूप विकसित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. स्पर्धेसाठी केवळ रस्तेच नव्हे, तर आवश्यक संपूर्ण सुविधा उभारण्यात आल्या असून, कामाच्या अंमलबजावणीचा हा वेग अभूतपूर्व असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. गेल्या तीन दशकांतील प्रशासनातील अनुभवात पाहिलेला हा एखाद्या आयोजनाच्या तयारीचा सर्वोच्च वेग असल्याचे नमूद करत त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp