Ekanth Shinde on Mayor of Mumbai: मुंबई महापालिकेचा निकाल लागल्यानंतर आता, मुंबईचा महापौर कोण होणार? याचे सर्वांना वेध लागले आहेत. महापौरपदासाठी भाजपा उद्धव ठाकरेंसोबत पडद्यामागून चर्चा करत असल्याचे दावे केले जात आहेत. एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी भाजपा मुंबईत रणनिती आखत असल्याची चर्चा आहे. दरम्यान शिवसेना आणि भाजपा मुंबई महानगरपालिकेत महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले असून मुंबईत महायुतीचा महापौर होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे जिथे एकत्र निवडणूक लढलो त्याठिकाणी महायुतीचाच महापौर बनवण्यात येईल असंही त्यांनी सांगितले.
मुंबईमध्ये महानगर निवडणूकध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने, आणि शिवसेनेने आपले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याने याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. मात्र या सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम देत मुंबईत महायुतीचाच महापौर होईल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईकर नागरिकांनी मोठ्या विश्वासाने महायुती म्हणून सेना – भाजपला मतदान केले असून त्यांच्या मतांशी प्रतारणा करून कोणताही वेगळा निर्णय शिवसेना घेणार नाही. नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असंही ते म्हणाले.
यासोबतच ज्या ज्या मनपामध्ये शिवसेना भाजप हे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले आहेत तिथेही महायुतीचाच महापौर बसविण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अन्य काही राजकीय समीकरणे तयार होत असल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नसून मुंबईत शिवसेना भाजप रिपाइं महायुतीचा महापौर होईल असे त्यांनी सांगितलं.
“आम्ही बहुमताचा आदर करणार असून, विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मुंबईत सध्या अफवा, अपप्रचार सुरु असून त्याला मी उत्तर देताना इतकंच सांगतो की, महायुतीला बहुमत दिलं असून महायुतीच महापौर होईल. ठाणे, कल्याण डोंबिंवली, उल्हासनगर तसंच राज्यातील इतर शहरात जिथे एकत्र लढलो आणि काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढलो. काही महापालिका सोडल्या तर महायुतीची एकत्र सत्ता स्थापन करणार आहोत. लोकांनी विकासाला स्विकारलं आहे. भावनिक मुद्द्यांनाही लोकांनाही नाकारलं आहे. त्यामुळे मुंबईकरांचा आदर करण्याचं काम महायुती करणार आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
“विरोधकच चर्चा पसरवत आहेत. हारल्यानंतरही टांग उपर अशी स्थिती आहे. खोट्या अफवा पसरवणं, आरोप करणं हेच त्यांचं काम आहे. आम्हाला कोणत्याही पक्षाची आवश्यकता नाही. शिवसेना आणि भाजपा अनेक ठिकाणी बहुमतात आहोत. त्यामुळे नगरसेवक पळण्याची गरज नाही. मुंबईत महायुतीचाच महापौर होईल,” असं त्यांना ठामपणे सांगितलं आहे.
“बार्गेनिंग करणं, महापौरपदाबद्दल कोणताही वाद, संभ्रम नाही. मुख्यमंत्री आता दावोसला आहेत, आल्यावर चर्चा होईल. चर्चेनंतर समन्वयाने निर्णय घेतला जाईल. आम्ही कोणताही दावा केलेला नाही. सत्ता आणि खुर्ची नाही तर विकास हेच आमचं ध्येय आहे. मुंबईला काय देणार, मुंबईचा विकास कसा करणार हे ध्येय आहे. सर्व अफवा आहेत त्याकडे लक्ष दिलं जाऊ नये,” असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
“नवीन नगरसेवक निवडून आले, त्यांचं वर्कशॉप झालं. कसं काम करायचं, आदर्श वॉर्ड यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. उद्या गट स्थापन झाल्यानंतर आपल्या वॉर्डात जातील. आमच्या नगरसेवकरांवर अविश्वास दाखवण्याची गरज नाही. उलट जे अफवा पसरवत आहेत त्यांनी आपल्या नगरसेवकांची चिंता करावी,” असा टोला त्यांनी लगावला आहे.