Kalyan Politics: महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी जोरदार तयारी सुरू झालीय. कल्याण-डोंबिवली महापालिकेत (केडीएमसी) बहुमत मिळवण्यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यात तीव्र स्पर्धा दिसतेय. येथे एकूण 62 नगरसेवकांचा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे. शिंदे गटाकडे 53, तर भाजपाकडे 50 नगरसेवक आहेत. ठाकरे गटाकडे 11 आणि मनसेकडे 5 नगरसेवक निवडून आले आहेत. या स्थितीत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना आपल्याकडे ओढण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न होत असल्याचे दिसते. यामुळे राजकीय वातावरण तापले असून सत्ता कुणाच्या हाती जाईल? याबाबत उत्सुकता वाढलीय. दरम्यानच्या काळात काय घडलंय? जाणून घेऊया.
राजकीय गोंधळ वाढला
केडीएमसीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्याकडून ठाकरे गट व मनसेच्या नगरसेवकांना फोडण्याचे आरोप होत आहेत. या प्रयत्नांमुळे ठाकरे गटाचे नऊ नगरसेवक अचानक अज्ञात ठिकाणी गेल्याची बातमी समोर आली आहे. सत्ता स्थापनेसाठी आम्हाला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्याचे एका नगरसेवकाने सांगितले. यामुळे राजकीय गोंधळ वाढला असून, नगरसेवकांची पळापळ सुरू झाली आहे. हे सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगितले जात असले तरी, विरोधकांकडून संपर्क होत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. अशा स्थितीत, महापालिकेत स्थिरता कशी येईल, याबाबत शंका उपस्थित होत आहे.
ठाकरे गटाचे दोन नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे संपर्काबाहेर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सुरुवातीला ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते. मात्र, नंतर शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले की, हे दोघे ठाकरे यांच्याच संपर्कात आहेत. यामुळे राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे. या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून आले असून, पुढील काही तासांत निर्णय होईल, असे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील म्हणाले.
राजकीय वर्तुळात चर्चा
शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांची भेट घेतली. ही भेट आशीर्वाद घेण्यासाठी आणि कौटुंबिक असल्याचे दोघांनी स्पष्ट केले. गायकवाड म्हणाले, ठाकरे गटाचे नॉट रिचेबल नगरसेवक ठाकरेंच्याच संपर्कात आहेत. मात्र शरद पाटील यांनी या भेटीला कौटुंबिक म्हटले आणि नगरसेवकांवर कारवाईचा उल्लेख केला. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
पक्षांतर्गत शिस्तीचा मुद्दा
केडीएमसीमध्ये सत्ता कुणाकडे जाईल, याबाबत अनिश्चितता आहे. शिंदे गट आणि भाजप यांच्यात वर्चस्वाची लढाई असली तरी, ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या हालचालींमुळे तणाव वाढलाय. नॉट रिचेबल नगरसेवकांवर कारवाई होणार असल्याने पक्षांतर्गत शिस्तीचा मुद्दा पुढे आलाय. यामुळे महापौर निवडीसाठीचे प्रयत्न अधिक जोरदार होत आहेत. राजकीय नेते सतर्क असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.