ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : कल्याण-डोंबिवलीमध्ये एकमेकांविरोधात उभे ठाकलेले शिंदेंची शिवसेना आणि मनसेनं हातमिळवणी केलीय. पालिकेच्या निकालानंतर सत्तेसाठी शिवसेनेनं गणिताची जुळवाजुळव सुरू केली, यानंतर मनसेनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिलाय, मनसेनं शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यानंतर ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झालीय. राज ठाकरेंना देखील घडलेला प्रकार अमान्य असल्याचं राऊतांनी म्हटलंय. त्यामुळे राज ठाकरेंचा आदेश डावलून राजू पाटलांनी पाठिंब्याचा निर्णय घेतला का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
कल्याण-डोंबिवलीत मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीर नाराजी व्यक्त केलीय. कल्याण डोंबिवलीत झालेला प्रकार राज ठाकरेंनाही मान्य नसल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. एकीकडे विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं मनसेचे माजी आमदार राजू पाटलांनी म्हटलंय, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या जखमेवर मनसेनं चागलंच मीठ चोळलंय त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत, दरम्यान बाळा नांदगावकरांना देखील हा प्रकार आवडलेला नाही.
कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेत टोकाची लढाई पाहायला मिळाली होती. त्यामुळे दोन्ही मित्रपक्षांनी एकमेकांवर कुरघोड्या करायला सुरूवात केली आहे.. दरम्यान यातच आता मनसेनं थेट शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं शिंदेंची शिवसेना बहुमताच्या जवळ पोहोचली आहे.
कल्याण-डोंबिवली
महानगरपालिका
एकूण जागा – 122
बहुमत – 62
केडीएमसीत भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांना बहुमतासाठी 12 नगरसेवकांची गरज आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचे 53 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांना बहुमतासाठी 9 नगरसेवकांची गरज आहे. मात्र, केडीएमसीत मनसेच्या 5 नगरसेवकांचा शिंदेंना पाठिंबा आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नॉट रिचेबल शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे, त्यामुळे शिंदेंचे 53, मनसेचे 5 आणि ठाकरेंचे 4 मिळून एकनाथ शिंदे बहुमत गाठत आहेत.
मनसेच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा प्रस्ताव दिला होता. यासंदर्भात मातोश्रीवर त्यांनी उद्धव ठाकरेंची देखील भेट घेतली होती, मात्र, त्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. मनसेनं केडीएमसीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यांनतर ठाकरेंच्या शिवसेनेनं संताप व्यक्त केलाय. दरम्यान यानंतर भाजप आणि शिंदेंच्या नेत्यांनी संजय राऊतांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. 2019 मध्ये काँग्रेससोबत गेल्यावर तुमची नितीमत्ता कुठे होती असा सवाल भाजपनं राऊतांना केला आहे.
सत्तेसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात कोण काय करेल याचा विचारही कुणी करू शकत नाही. याची अनेक उदाहरणं मागील काही दिवसात महाराष्ट्रानं बघितलीत भाजपनं एमआयएम आणि काँग्रससोबत युती केल्याचं पाहिलं आता एकमेकांविरोधात उभे ठाकलेले मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेनं एकमेकांशी कल्याण-डोंबिवलीत सत्तेसाठी जुळवून घेतलंय. मात्र, दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेत. मात्र, उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेले एकनाथ शिंदेंना मनसेनं साथ दिल्यानं दोन्ही भावांमध्ये पुन्हा मतभेद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.