Maharashtra Weather News : हिमालयावरून येणाऱ्या शीतलहरींमुळं देशाच्या उत्तरेकडे तापमानात घट होत असून ही घट प्रामुख्यानं उत्तरेकडील पर्वतीय राज्यांमध्ये लक्षणीयरित्या दिसून येत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरच्या बहुतांश भागांमध्ये हिमवर्षाव सुरू असतानाच इथं महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये मात्र हवामानात सातत्यानं बदल होत असून, तापमानात चढ- उतार नोंदवले जात आहेत.
हवामान विभागाच्या प्राथमिक निरीक्षणानुसार देशात पुढच्या 24 तासांमध्ये ढगाळ वातावरण वाढणार असून, मध्य आणि दक्षिण भारतासह पूर्वोत्तर भारतामध्ये ही स्थिती पाहायला मिळेल. महाराष्ट्रात मुंबई आणि कोकणात प्रामुख्यानं हवामान दमट राहणार असून आकाश अंशत: ढगाळ असेल. तर, घाटमाथ्यावर पहाटेच्या वेळी धुकं आणि दवबिंदू अद्यापही गारठा कायम असेल असाच इशारा वर्तवत आहेत. सरासरी तापमानाच्या बाबतीत पुढील 24 तासांमध्ये काहीशी वाढ नोंदवली जाणार असून, यामुळं थंडीचं राज्यातील प्रमाण असमान असेल असा इशारा आहे. सागरी किनारपट्टी भागांमध्ये सूर्य मावळतीला गेल्यानंतर सोसाट्याचे आणि काहीसे थंड वारे वाहतील ज्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात हवा कोरडी राहील. तर, सोलापूर, सातारा (पाचगणी, वाई) इथं पुढचे 24 तास गारठा कायम असेल. सध्या मध्यप्रदेशातील उत्तर पश्चिमेस चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्यामुळं बंगालच्या उपसागरातून ताशी 25 ते 30 किमी वेगानं आर्द्र वारे वाहत आहेत. ज्यामुळं मागील काही दिवसांपासून थंडीचं प्रमाण कमी होऊन ढगाळ वातावरणाचं वर्चस्व राज्यात पाहायला मिळत आहे.
देशातील हवामानाची स्थिती आणि महाराष्ट्रावर होणारा परिणाम
केंद्रीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तरेकडील 5 राज्यांमध्ये पुढील 48 तासांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळणार असून, त्यामुळं तापमानात आणखी घट होणार आहे. तर, पूर्व भारतातसुद्धा हवामान बिघडू शकतं. पश्चिमी झंझावात उत्तर भारतातील अनेक राज्यांवर परिणाम करत असून, काही राज्यांत लक्षणीय तापमान घट नोंदवली जाणार आहे. 26, 27 आणि 28 जानेवारी या दिवसांमध्ये एक नवा झंझावात उत्तर भारताच्या दिशेनं येत असून स्तायेच परिणाम पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, राजस्थानचा उत्तर भाग आणि मध्य प्रदेशापर्यंत दिसून येईल.
जम्मू आणि हिमाचलच्या मैदानी भागांमध्ये पावसाचा इशारा इसून, वाऱ्याचा वेगही अधिक राहणार आहे. तर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये अनपेक्षितपणे काही मैदानी भागांमध्येही हिमवर्षाव होणार असल्यानं इथं पर्यटनासाठी जाणाऱ्यांनाही यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.