Girish Maharaj Social Media Post after row over not taking Dr Babasaheb Ambedkar Name: गिरीश महाजनांनी प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदन सोहळ्यात बाबासाहेबांचा नामोल्लेख टाळल्यानं एका महिला वनकर्मचा-यानं घोषणाबाजी केली. या वनकर्मचा-याच्या आंदोलनानं परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. आंबेडकरी संघटनांनीही या प्रकरणात आंदोलनाची भूमिका घेतलीय. तर दुसरीकडं गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त करुन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडण्याचाही प्रयत्न केला.
गिरीश महाजनांनी पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते… म्हणून आपण आहोत ! महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणे हा भाजपचा संस्कार आहे. आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः सलग 40 वर्षांपासून दरवर्षी आंबेडकर जयंतीला ट्रॅक्टर चालवतो, लेझीम खेळतो. आंबेडकरी विचार आमच्या केवळ भाषणात नाही, तर प्रत्यक्ष कृतीतही आहे,” असं सांगत गिरीश महाजन यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या भाषणाची क्लिपही जोडली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते… म्हणून आपण आहोत !
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणे हा भाजपचा संस्कार आहे. आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः सलग ४० वर्षांपासून दरवर्षी आंबेडकर जयंतीला ट्रॅक्टर चालवतो, लेझीम खेळतो. आंबेडकरी विचार आमच्या केवळ भाषणात… pic.twitter.com/qNuZ3BcbOy
— Girish Mahajan (@girishdmahajan) January 26, 2026
नेमकं काय झालं होतं?
नाशिकमधील शासकीय ध्वजवंदन गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याचा आरोप करत माधवी जाधव या महिला वनकर्मचा-यानं घोषणाबाजी केली. बाबासाहेबांचा पालकमंत्र्यांनी नामोल्लेख कसा टाळला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. वर्दीतल्या महिला कर्मचा-यानं केलेल्या घोषणाबाजीनं एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. आपल्याला निलंबित केलं तरी पर्वा नाही पण बाबासाहेबांचा उल्लेख टाळणं सहन केलं जाणार नाही अशी भूमिका माधवी जाधव यांनी घेतली होती.
गिरीश महाजनांनी बाबासाहेबांचा उल्लेख केला नसल्याचा मुद्दा लगेचच तापला. नाशिकमधील भीम सैनिकांनी गिरीश महाजनांविरोधात आंदोलन केलं. गिरीश महाजनांच्या माफीनाम्याचीही मागणी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही गिरीश महाजनांवर टीकास्त्र सोडलं.
गुन्हा दाखल करा नाहीतर उपोषण करणार असा इशारा माधवी जाधव यांनी दिला. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी संविधानाला मानणारे लोकं नाहीत अशी टीकी केली. तर वंचितचे कार्यकर्ते चेतन गांगुर्डे यांनी महाजन यांची ही मानसिकता असल्याची टीका केली.
गिरीश महाजनांची दिलगिरी
माधवी जाधव यांनी केलेल्या घोषणाबाजीची चर्चा नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होती. जेव्हा गिरीश महाजन यांना माधवी जाधव यांनी केलेल्या घोषणाबाजीबाबत विचारलं असता, त्यांनी भाषणाच चुकून बाबासाहेबांचा उल्लेख करायचा राहून गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
शासकीय कर्मचारी तीही महिला अशा प्रकारचं धाडस करताना दिसत नाही. पण बाबासाहेबांचा उल्लेख भाषणात नसल्यानं थेट मंत्र्यांना जाहीर सवाल विचारण्याची हिंमत माधवी जाधव यांनी केलीय. माधवी जाधव यांनी घेतलेल्या या भूमिकेची चर्चा वनविभागासह शासकीय कर्मचा-यांमध्येही होती.